Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय चिखलात फुटीर घराण्यांचा सुळसुळाट, पोरगा एका पक्षात तर वडिल दुसर्याच पक्षात, नवरा एका पक्षात तर बायको तिसऱ्या पक्षात
Dhairyashil Mohite Patil-Eknath Khadse-Gajanan Kirtikar-Ranajagjitsinha Patil : गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरश: चिखल झालाय. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले. दोन पक्षांमधून आणखी दोन पक्ष तयार झाले.
Maharashtra Politics : गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरश: चिखल झालाय. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले. दोन पक्षांमधून आणखी दोन पक्ष तयार झाले. दरम्यान, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात राजकीय घराणी चर्चेचा विषय ठरली आहेत. पक्षात फूट पडल्यामुळे काही ठिकाणी एका कुटुंबातील व्यक्ती दोन वेगवेगळ्या पक्षात आहे. महाराष्ट्रात एक प्रकारे राजकीय घराण्यांचा सुळसुळात पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे पोरगा एका पक्षात तर वडिल दुसर्याच पक्षात, नवरा एका पक्षात तर बायको तिसऱ्या पक्षात आणि सून एका पक्षात तर सासरा वेगळ्याच पक्षात अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, एकाच कुटुंबात दोन पक्ष असलेली कोणकोणती घराणी आहेत? जाणून घेऊयात..
बायको अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तर नवरा भाजप आमदार
धाराशिवमधील भाजप नेते राणा जगजीतसिंह पाटील यांच्या कुटुंबात दोन पक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राणा पाटील यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे नवरा भाजपमध्ये तर बायको राष्ट्रवादीत अशी परिस्थिती आहे.
एकनाथ खडसेंची सून भाजपमध्ये तर मुलगी राष्ट्रवादीत
भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी मी तुतारी सोडणार नाही, असं रोहिनी खडसे यांनी म्हटलंय. शिवाय काही दिवसांत एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. तर एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे सासरा भाजपच्या वाटेवर, सून भाजपमध्ये तर मुलगी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अशी अवस्था आहे.
वडिल शिंदे गटात तर पोरगा ठाकरे गटात
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एक शिवसेना आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दुसरी शिवसेना आहे. दरम्यान, सेनेचे नेते गजानन किर्तीकर शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेले तर त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर ठाकरे गटात आहेत. शिवाय अमोल किर्तीकरांना ठाकरे गटाने लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अमोल किर्तीकर यांच्या वडिलांवर म्हणजेच गजानन किर्तीकर यांच्यावर मुलाविरोधात प्रचार करण्याची वेळ येऊ शकते.
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात तर चुलत भाऊ धैर्यशील राष्ट्रवादीत
माढामध्ये मोहिते पाटील घराण्यातही एक भाऊ भाजपात तर एक भाऊ शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपकडून विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या मोठ्या घराण्यांमध्ये दोन पक्ष असल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या