Ajit Pawar Hoarding : "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..."; जयंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवारांचे होर्डिंग
Ajit Pawar Hoarding : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Ajit Pawar Hoarding : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यापाठोपाठ आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचेही होर्डिंग्ज मुंबईत (Mumbai) झळकले आहेत. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर होर्डिंग
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हे होर्डिंग लागलं आहे. "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..." अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे.
जयंत पाटील यांचंही होर्डिंग
महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्य वाढदिवसानिमित्त त्यांचे काही पोस्टर्स मुंबईत झळकले होते. या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्यामुळे राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगू लागली.
VIDEO : Jayant Patil Banners : जयंत पाटील यांच्या वाढदिवसांचे बॅनर्स चर्चेत, भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम : जयंत पाटील
दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा मला विश्वास आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे संख्याबळावर ठरेल. तसंच संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आलं तर मुख्यमंत्री कोण असेल हे शरद पवारच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल," असं जयंत पाटील म्हणाले होते.
राष्ट्रवादीकडून तीन नावं आघाडीवर
दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी तीन प्रमुख नावं आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ही प्रमुख नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतात. आतापर्यंत राज्यात अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अशी विविध पदं भूषवलेल्या अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाने मात्र हुलकावणी दिली आहे. तर महाविकास आघाडीची पुढची मुख्यमंत्री महिला असेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय 2014 पासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सक्षम काम करणारे जयंत पाटील यांचं देखील नाव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतं.