Maharashtra Olympic Association Election: अजितदादांनी क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान केलंय; महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्या, भाजप नेत्याची मागणी
Maharashtra Olympic Association Election: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.

Maharashtra Olympic Association Election: राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सध्या एक निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association Election) अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसेच माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. 2 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Ramdas Tadas Allegations : भाजपा नेते रामदास तडस यांचा आरोप
भाजपचे नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांवर थेट आरोप करत, त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली आहे. अजितदादा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्या. क्रीडा संघटनांवर माजी खेळाडूंनाच राहू द्या, तिथे राजकारण आणू नका. अजित पवारांच्या मागील तीन टर्ममध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अजित पवार यांच्या समितीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या खर्चाचा हिशोबही दिलेला नाही, असा गंभीर आरोप रामदास तडस यांनी केलाय. तर अजितदादांनी निवडणुकीतून बाजूला होऊन क्रीडा क्षेत्राचा हे महत्त्वाचं संघटन एका माजी खेळाडूच्या (मुरलीधर मोहोळ माजी कुस्तीपटू आहेत) नेतृत्वात काम करेल अशी संधी निर्माण करावी अशी अपेक्षाही रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे.
Ajit Pawar vs Murlidhar Mohol: पवार विरुद्ध मोहोळ; एक प्रतिष्ठेची लढत
अजित पवार यांनी तीन वेळा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले असून, या संघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे. दुसरीकडे, मुरलीधर मोहोळ हे माजी कुस्तीपटू असून सध्या भाजपचे लोकसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे या निवडणुकीला केवळ संघटनात्मक महत्त्व नाही, तर ती राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरत आहे.
Maharashtra Olympic Association Election: निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
या निवडणुकीसाठी दोन्ही दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. ही निवडणूक आता थेट लढतीच्या स्वरूपात होईल, असे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे, या निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Olympic Association Election: केवळ 60 मतदार
या निवडणुकीत फक्त 60 मतदार आहेत, जे विविध जिल्हा क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी आहेत. यातील अनेक संघटनांवर गेल्या काही वर्षांपासून राजकीय प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कबड्डी व खो-खो संघटनांतील निवडणुकांमध्ये मतांबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
















