जे सरकारला जमलं नाही ते एकट्या जलील यांनी केलं; बंगळुरूला निघालेली कंपनी औरंगाबादला...
Aurangabad: तब्बल 700 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली अमेरिकेन आयटी कंपनी बंगळुरूला जाणार असतानाच तिला औरंगाबादमध्ये आणण्यासाठी जलील यांना येश आले.
Aurangabad News: काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षात मोठ्याप्रमाणावर राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. एवढा मोठा प्रकल्प राज्यातून गेल्याची बाब समोर आल्यावर दोन्ही बाजूने एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र याच दरम्यान जे सरकारला जमलं नाही ते एकट्या औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी करून दाखवले आहे. कारण तब्बल 700 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली अमेरिकेची आयटी कंपनी बंगळुरूला जाणार असतानाच, तिला औरंगाबादमध्ये आणण्यासाठी जलील यांना येश मिळाले असल्याची बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
हैदराबादेत मुख्यालय असलेल्या एका अमेरिकेन आयटी कपंनीने आपला विस्तार वाढवण्यासाठी बंगळुरूमध्ये नवीन कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे या कंपनीचे मालक मिर्झा अहेमद बेग यांचे वडील आणि जलील यांचे वडील एकत्र सोबत नोकरीला होते. याची माहिती मिळताच जलील यांनी त्यांना संपर्क साधत त्यांची नवीन कंपनी औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये (डीएमआयसी) सुरु करण्याची विनंती केली. मात्र त्यांचा काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जलील यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
जलील यांनी पुन्हा संवाद साधला...
दरम्यानच्या काळात एका दौऱ्याच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या जलील यांनी पुन्हा एकदा मिर्झा अहेमद बेग यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना अनेक मुद्दे पटवून दिले. तसेच दोन्ही ठिकाणातील फरक समजून सांगत त्यांचा औरंगाबाद येथे कसा फायदा होणार हे देखील पटवून दिले. त्यामुळे अखेर बेग यांनी औरंगाबाद येथे गुंतवणूकीस होकार दिला असून, वर्षअखेर कंपनीचे कामकाज सुरू होऊ शकते, असे जलील म्हणाले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये कंपन्यांना आणण्यासाठी जे सरकारला जमत नाही ते एकट्या जलील यांनी करून दाखवल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
सॉफ्टवेअर निर्यातमध्ये भर
बंगळुरू आणि पुण्याप्रमाणे औरंगाबादेत 'आयटी' क्षेत्र अद्याप उभं राहिलेलं नाही. मात्र शहरात आहे त्या कंपन्यांतून गेल्या काही वर्षात सॉफ्टवेअर निर्यातमध्ये भर पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातून सुमारे 90 कोटींपर्यंत सॉफ्टवेअर निर्यात केली जातात. प्राथमिक माहितीनुसार शहरात 4 मोठ्या आयटी कंपन्या असून, 25 छोट्या कंपन्या आहेत. अंदाजे या सर्व कंपन्यांची वार्षिक उलाढाल 150 कोटी रुपये आहे. त्यामुळे आता शहरात नव्याने आणखी एक आयटी कंपनी आल्यास औरंगाबाद शहारतील 'आयटी' क्षेत्र विस्तारत याचा फायदा होईल.
500 तरुणांना रोजगार मिळणार: जलील
औरंगाबाद जिल्ह्यात येत असलेल्या या आयटी कंपनीमुळे 500 लोकांना रोजगार मिळणार आहे. तर यासाठी संबंधित कंपनीची समितीने औरंगाबादचा दौरा करून जागेची पाहणी सुद्धा केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2023 पर्यंत ही कंपनी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा औरंगाबादला होणार असून, शहरातील 500 तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील एबीपी माझाशी बोलतांना म्हणाले.