Jalgaon News : माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होईल; खोक्यांच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांचं खडसेंना आव्हान
Jalgaon News : खोक्यांच्या आरोपांना आता मुक्ताईनगरमधील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील माणसं बसवा आणि माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट करा. दूध का दूध पानी का पानी होईल," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Jalgaon News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह केलेल्या बंडानंतर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. शिवाय 50 खोके एकदम ओके ही घोषणाही देण्यात आली. त्यातच जळगाव दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपांना आता मुक्ताईनगरमधील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर दिलं आहे. "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील माणसं बसवा आणि माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट (Brain Mapping Test) करा. दूध का दूध पानी का पानी होईल," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
जळगाव जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीवरुन जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन 50 खोक्यांचा वापर निवडणुकीत केला असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर हल्लबोल केला. हायकोर्टात माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा असं चॅलेंज त्यांनी एकनाथ खडसे यांना दिलं आहे. दूध संघाचा निकाल खडसेंच्या विरोधात लागल्यास ते खोक्यांवर बोलतील हे भाकित मी आताच करत. ब्रेन मॅपिंगनंतर एकनाथ खडसे महाराष्ट्रासमोर उघडे पडतील, असा निशाणाही खडसेंवर साधला आहे.
एकनाथ खडसे काय म्हणाले होते?
जळगाव जिल्हा दूध संघात निवडणुकीत सत्तेचा वापर करत विरोधकांकडून खोक्याचा वापर होईल, धनाचा वापर होईल. विरोधकांवर आता आम्हाला बोलायचं नाही किंवा त्यांना उत्तर पण द्यायचं नाही असं म्हणत मतदार मात्र सत्याच्या बाजूने आहेत. ते मतदानाच्या आणि निकालाच्या दिवशी दिसेलच, अस म्हणत एकनाथ खडस म्हणाले होते.
जळगाव दूध संघाची आज निवडणूक
एकनाथ खडसे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जळगाव दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत या सर्व नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याने यामध्ये कोणाला विजय मिळतो या कडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. मागील काळात एकनाथ खडसे यांच्या समर्थक संचालक मंडळाची दूध संघावर सत्ता होती. मात्र एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचले असल्याने दोन्ही नेते एकमेकांची सत्तास्थाने काबीज करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार हे या निवडणुकीच्या रिंगणात असून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या संचालक मंडळाची सत्ता पायउतार करण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसली असल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे.