Maharashtra Budget 2023: 'आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिलं नाही', मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Budget 2023: ''आम्ही गाजर हलवा तरी देतोय त्यांनी (उद्धव ठाकरे) काहीच दिलं नाही, स्वतः खाल्लं दुसऱ्याला काहीच दिलं नाही'', असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Maharashtra Budget 2023: ''अर्थसंकल्पातून मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाजर हलवा अर्थसंकल्प आहे'', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केली आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर दिलं आहे. ''आम्ही गाजर हलवा तरी देतोत त्यांनी (उद्धव ठाकरे) काहीच दिलं नाही. स्वतः खाल्लं दुसऱ्याला काहीच दिलं नाही'', असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''आकडे फुगविण्यासाठी आम्ही बजेट मांडला नाही. आम्ही काही शिल्लक ठेवलं नाही. बजेटचे आकडे पाहिल्यानंतर त्यांना (विरोधी पक्षांना) बोलायला काही नव्हतं. त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे.''
Maharashtra Budget 2023: राज्यात 700 नवीन 'आपला दवाखाना' सुरू करणार
अर्थसंकल्पानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''असंघटित कामगार, जेष्ठांसाठी आम्ही निर्णय घेतले आहेत. तरुणांना सुद्धा रोजगार देऊन स्वतः पायावर उभे करण्याचं काम केलं जाईल. पायाभूत सुविधांचे काम राज्यात सुरू आहे, अनेक प्रकल्प हाती घेतोय. राज्यातील जनतेची आरोग्याची काळजीही आपण घेत आहोत. राज्यात 700 नवीन आपला दवाखाना सुरू करतोय. आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न बजेटमध्ये करण्यात आला आहे. अडीच वर्षात जे ठप्प होतं, त्याला चालना देण्याचा काम केलंय. जो मेगा ब्लॉक विकास कामांच्यामध्ये तयार झाला होता, तो बाजूला करण्याचा काम केलं आहे.''
तत्पूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, ''आजचं बजेट 10 ते 15 वर्षातील सर्वोत्तम बजेट आहे. फडणवीस यांचं अभिनंदन, त्यांनी अभ्यासपूर्ण बजेट मांडले. सर्वसमावेशक असं बजेट आहे. शेतकरी, विद्यार्थी कष्टकरी सगळ्यांचा विचार यामध्ये केला आहे. 6 हजार महिना शेतकऱ्यांना देणार आहोत. केंद्राचे राज्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार. महिलांसाठी योजना या बजेटमध्ये आहे.''
Maharashtra Budget 2023: अजित पवार यांची अर्थसंकल्पावर टीका
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ते म्हणाले, ''होतं नव्हतं ते जाहीर करा, पुढचं पुढं बघू, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे. वीज गॅस पाणीपुरवठा सेवा याकडे आजच्या अर्थसंकल्पात निधी नाही. तुकाराम महाराज यांच्या देहूसाठी काही घोषणा करतील असं वाटलं होतं, मात्र काहीचं केलं नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकाच्या बाबतीत काहीचं घोषणा केली नाही.''