Hindi compulsory in Maharashtra: राज-उद्धव ठाकरे मोर्चात एकत्र येण्याची चाहूल लागताच भाजपचं मोठं पाऊल, मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार
BJP on Hindi Vs Marathi Politics: मराठीच्या मुद्द्यावरुन 5 जुलैच्या मुंबईतील मोर्चात ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे. हे राजकारण हाणून पाडण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत.

Hindi Language in Maharashtra Schools: राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती (Hindi Language) आणि त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी होऊन देणार नाही, असा ठाम निर्धार राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. यासाठी येत्या 5 जुलै रोजी राज ठाकरे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली. या मोर्चात सर्व मराठी विद्यार्थी, पालक आणि सर्वपक्षीय राजकारण्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेदेखील या मोर्चात सहभागी होऊ शकतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब भाजपसाठी (BJP) डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मोर्चा काढण्याच्या घोषणेनंतर भाजपच्या अंतर्गत वर्तुळात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत.
भाजपने मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात आल्याचे समजते. त्यानुसार मराठी-हिंदीवरुन सुरु असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करुन शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला, ही गोष्ट भाजप लोकांपर्यत पोहोचवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार, याचे महत्त्व भाजपकडून लोकांमध्ये जाऊन सांगितले जाणार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या रेट्यापुढे भाजप हा मुद्दा जनतेच्या मनावर बिंबवण्यात कितपत यशस्वी ठरणार, हे बघावे लागेल.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: गिरगावच्या मोर्चासाठी राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंशी संपर्क?
राज ठाकरे यांनी 5 जुलैला शाळांमधील हिंदी सक्तीच्याविरोधात मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी आपण सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करणार असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे हेदेखील आले. त्यामुळे आमची लोकं त्यांच्याशी संपर्क साधतील, असे राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, कालच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरे यांनी फोनवरुन ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याशी संपर्क साधला. उभयातांमध्ये बोलणे झाले आहे. यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख बदलून 5 जुलै केली. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी 6 जुलैला हा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. परंतु, दोन तासांनी राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलत 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी हा विराट मोर्चा असेल, असं प्रसिद्धपत्रक जाहीर करत सांगितले. यासाठी राज ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्याची फोनवरील चर्चा कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 7 जुलै रोजी मराठी समन्वय समितीच्या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली होती. परंतु, ठाकरे बंधूंनी दोन स्वतंत्र मोर्चे काढण्याऐवजी एकाच मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली ती ठाकरे गटाच्या म्हणण्यानूसार बदलली गेली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा
6 जुलैच्या मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज ठाकरेंनी पुन्हा 'ते' वाक्य उच्चारलं























