Maharashtra Adhiveshan: आरक्षण बैठकीवरुन दोन्ही सभागृहात धुमश्चक्री, नीलम गोऱ्हेंनी थेट मार्शल्स बोलवले, सत्ताधारी वेलमध्ये, परिषद दिवसभरासाठी तहकूब
Vidhan Parishad: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत प्रचंड गोंधळ, उपसभापतींनी मार्शल्सना बोलावले, आमदारांना एक फूट अंतर राखण्याचे निर्देश. विधानपरिषद आणि विधानसभेत जोरदार राडा. विरोधकांनी वादात खेचलं
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील बुधवारचा दिवस वादळी ठरला. आज सभागृहात कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मुंबईत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला मविआच्या नेत्यांनी दांडी मारली होती. हाच धागा पकडत सत्ताधारी आमदारांनी महाविकास आघाडी (MVA Alliance) मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यांना मराठा-ओबीसी ही समस्या सोडवायची नसून हा मुद्दा धगधगता ठेवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजायची आहे, असा आरोप सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केला. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आणि विधानसभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. यानंतर काहीवेळातच विरोधकांनी विधानपरिषदेत (Vidhanparishad) ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा उपस्थित करत हा हिशेब चुकता केला.
ओबीसी आणि मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यावर ओबीसी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार गोंधळ घालण्यात आला. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात मार्शल्सन पाचारण केले. तसेच सभागृहातील सदस्यांना एकमेकांपासून एक फूट अंतर ठेवून उभे राहण्याचे निर्देश दिले.
उपसभापतींनी सभागृहात मार्शल्सना पाचारण केल्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार गोंधळ सुरुच राहिला. याच गोंधळामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुरवण्या मागण्या मंजूर करत कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विरोधकांनी सभागृह डोक्यावर घातले, त्याला सत्ताधारीही तितक्याच त्वेषाने प्रत्युत्तर देत होते. अखेर वाढता गोंधळ पाहता नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधानपरिषद सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेतही तुफान राडा, नेमकं काय घडलं?
विधानसभेतही मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुफान राडा झाला. कालच्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनीच सभागृहात विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. भाजपचे आमदार अमित साटम आणि आशिष शेलार यांनी प्रथम आक्रमक भूमिका घेत विरोधकांना धारेवर धरले. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विजय वडेट्टीवार काल बैठकीच्या आधी म्हणत होते की, आजच्या बैठकीत तोडगा निघेल. मग ते बैठकीला का गेले नाही? मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायची की नाही हे तुम्ही स्पष्ट करावे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण दिले. मात्र त्याला विरोध करायला काँग्रेसचा कार्यकर्ता गेला होता, असा आरोप राम कदम यांनी केला.
भाजप आमदार संजय कुटे काय म्हणाले?
- कालच्या बैठकीला उपस्थित राहू नका या संदर्भात कोणाचा फोन आला
- याआधी ही विरोधी पक्ष बैठकीला उपस्थित होते
- मग काल काय झालं
- राष्ट्रवादी चे मोठे नेते त्यावेळी काय बोलले होते
- याची भुमिका दुतोंडी आहे
- नरोवा कुंजरोवा करतात
- मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावा का, या संदर्भात त्यांनी भुमिका घ्यावी
- समाजासामाजात भांडणं लावली जात आहे
- महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते सांगतात की हे वातावरण पेटत ठेवायचं आहे, तर सत्ता येईल
- तुम्ही प्रामाणिक राहा, सत्ता तुम्हाला लखलाभ
- जो पर्यंत विरोधक लेखी भुमिका देत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही
अशिष शेलार काय म्हणाले?
- काँग्रेस उबाठा सेनेने मराठा समाजाची माफी मागितली
- जर मराठा समाज म्हणतोय की आमचा तुमच्यावर विश्वास आहे
- तुमची आणखी एक बैठक होऊ द्या तर काय अडचण आहे
विजय वडेट्टीवार
- मुख्यमंत्री एका बाजूने चर्चा करतात तर दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूशी चर्चा करतात
मराठा आणि ओबीसींविषयी मविआचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले: दरेकर
जातीय तेढ संपावी, असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. पण काल मविआचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले. राज्यातले वातावरण सलोख्याचे व्हावे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक लावली होती. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे कुठले ही नेते आणि प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नव्हते. राज्य पेटतं रहावं आणि आपली राजकीय पोळी भाजावी, असा नीच विचार काल दिसून आला. राजकीय पक्षांची मराठा-ओबीसी आरक्षणावरची लेखी भूमिका मागवावी, असे कालच्या बैठकीत ठरले, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
राज्यातील जनतेला काय ते कळावे, यासाठी आम्ही आज सभागृहात बोललो. हे बैठकीला का आले नाहीत. हे नीच राजकारण करत आहेत. पवार साहेब, उद्धव ठाकरे आपली आरक्षणाबाबत आपली भूमिका काय आहे ते सांगा. नकटीच्या लग्नाला सोळा विघ्न, असे यांचे झाले. परत विश्वासात घेऊन बैठक घेऊ, बघू हे काय करतात. यांना महाराष्ट्र पेटवायचा असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.