Sanjay Raut : 'भाजपसह गद्दार गटाचा पराभव करणार', संजय राऊतांनी सांगितलं मविआच्या जागा वाटपाचं सूत्र, म्हणाले...
Sanjay Raut : घटस्थापनेपूर्वी जागावाटपाचा तिढा सुटणार, असा दावा काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून केला जात आहे. आता खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. दररोज बैठकांचा धडाका दिसून येत आहे. त्यातच महाविकास आघाडीत काँग्रेस (Congress) आणि शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) 100 जागांवर अडून बसल्याची चर्चा आहे. घटस्थापनेपूर्वी जागावाटपाचा तिढा सुटणार, असा दावा काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करण्यात महाविकास आघाडीला मदत करणाऱ्या सर्व छोट्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहे. तीन घटक पक्षांची संपूर्ण चर्चा पूर्ण होईल. त्यानंतर समजेल कोण कुठे लढत आहे. आम्ही आकड्यांवर बोलत नाहीये. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून प्रत्येक मतदारसंघात लढत आहोत. हे आमचं सूत्र आहे. लोकसभेला तेच सूत्र होते आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील.
गद्दार गटाचा पराभव करायचाय
प्रत्येक मतदार संघावर आमची चर्चा सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघात जिंकण्याचं गणित वेगळे असते. त्यात अनेक पैलू असतात. त्यामुळे वेळ लागत आहे. आम्ही आकडे घेऊन बसलो तर तासाभरात जागावाटप झाले असते. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे, असे त्यांनी म्हटले.
त्यांनी पंतप्रधानांसारखे वागावे
दसऱ्याच्या आज सगळं चित्र स्पष्ट होईल. आमच्या जागावाटपासाठी दिल्लीतून काही कोणी यावं लागणार नाही. आता महाराष्ट्रात देशाचे गृहमंत्री येऊन बसलेत. जागा वाटपाच्या चर्चेसाठी पंतप्रधान देखील येणार आहेत. त्यांनी पंतप्रधानांसारखे वागले पाहिजे. पंतप्रधान कधी अशा प्रकारे प्रचार करतात का? देशाचा पंतप्रधान कधी अशा प्रकारे प्रचार करताना पाहिलं आहेत का? सरदार वल्लभभाई पटेल काय महाराष्ट्रात जागा वाटपासाठी चर्चेला येऊन बसायचे का? असा टोला त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
24 नोव्हेंबरच्या आधी नवीन विधानसभा प्रस्थापित करावीच लागणार
ते पुढे म्हणाले की, देश वाऱ्यावर सोडून आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्लीबोळात प्रचार करण्यासाठी करत आहेत आणि म्हणे वन नेशन वन इलेक्शन करणार. त्यांना झेपणार आहे का हे? गृहमंत्री किती दिवसापासून महाराष्ट्रात फिरत आहेत. पंतप्रधानांनी एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन केले आहे. एकच मेट्रो आहे. सहा वेळा काय नारळ फोडताय? अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. तर आचारसंहिता आणि निवडणुका लांबणीवर पडणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजिबात लांबणीवर पडणार नाही. 24 नोव्हेंबरच्या आधी त्यांना नवीन विधानसभा प्रस्थापित करावीच लागणार आहे.
आणखी वाचा
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? 'या' दिवशी होणार घोषणा