Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकासाठी मविआचा मुंबईतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा मिळणार?
vidhansabha election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाला सुरुवात. मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक 22 जागा मिळण्याची शक्यता. काँग्रेस आणि शरद पवार गट राजी होणार का? आज महत्त्वाची बैठक
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मविआचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मुंबईतील जागावाटपात ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ राहणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील जागा मेरिटनुसार लढण्यावर मविआच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. मुंबईत ठाकरेंची शिवसेना 20 ते 22 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. काँग्रेसचा 13 ते 15 जागांवर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 5 ते 7 जागांवर दावा सांगितला आहे.सध्याच्या माहितीनुसार, मुंबईत ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि शरद पवार गट सकारात्मक असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे आजच्या बैठकीत मुंबईसाठीचा हा फॉर्म्युला सर्वानुमते मान्य होणार का, हे बघावे लागेल. कारण, मुंबईतील जागावाटप ठरल्यानंतरच मविआच्या राज्याच्या इतर भागांमधील जागावाटपाला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण 30 जागा जिंकल्या होत्या. तर सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील निवडून आले होते. मविआच्या एकूण 30 जागांपैकी काँग्रेसला 13, ठाकरे गटाला 9 आणि 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जास्त जागांसाठी आग्रही राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्यातून मविआचे नेते कसा मार्ग काढणार, हे बघावे लागेल.
ठाकरेंसाठी मुंबई महत्त्वाची
लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला चांगले यश मिळाले होते. ठाकरे गटाने मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 3 जागांवर विजय मिळवला होता. तर वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 47 मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेच्यादृष्टीने मुंबई नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल. त्यापूर्वी मुंबईत जास्त आमदार निवडून आणल्यास उद्धव ठाकरे यांना शहरात स्वत:ची हवा तयार करता येईल. जेणेकरुन देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या मुंबईचा कारभार पुन्हा ठाकरेंच्या हातात राहू शकतो. त्यासाठी ठाकरे गट विधानसभेला मुंबईतील जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
आणखी वाचा
विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित; महायुतीचा तिढा कायम?
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जॅकपॉट लागणार? 85 जागांवर अनुकूल परिस्थिती, अंतर्गत सर्व्हेचा रिझल्ट