(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविकास आघाडीच ठरलं म्हणता म्हणता...'वंचित'नं आणखी एक 'व्हिडिओ बॉम्ब' टाकलाच
Maha Vikas Aghadi : वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना घेण्याबाबत आघाडीने अधिकृत पत्र काढल्यावर आता गाडी रुळावर आल्याची चर्चा असतानाच, आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर (Dr. Darhivardhan Pundakar) यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत काँग्रेस (Congress) नेत्यांवर निशाणा साधला आहे. सोबतच काँग्रेस नेत्यांच्या युती तोडण्याची भूमिका असल्यास आघाडी कशी होणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच ठरलं म्हणता म्हणता, आता 'वंचित'नं आणखी एक 'व्हिडिओ बॉम्ब' टाकल्याने नव्या वादाला सुरवात होण्याची शक्यता आहे.
वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, “ 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ माझ्या नेतृत्वात सहभागी झाले होते. त्यापूर्वीच्या बैठकीत महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर उपस्थित राहिले पाहिजे असे सांगितले होते. महाविकास आघाडीच्या विनंतीला मान देऊन, वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत निर्णय घेण्याचा अधिकार मला देण्यात आला आहे. या बैठकीत असे ठरले की, जागावाटप बोलणी सुरू करण्यापूर्वी तात्विक मुद्द्यांवर एकत्र आलं पाहिजे. राजकीय पक्षांमध्ये एकमेकांच्या भूमिका संदर्भात अस्पष्टता राहू नये त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मसुदा देण्यात आला. हा मसुदा महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाने त्यांच्या पक्षात विचार विनिमय करून करा, यावर त्यांच्या पक्षात एकमत झालं तर तो ड्राफ्ट चार दिवसात अंतिम करावा. त्यासाठी प्रत्येक पक्षाने दोन प्रतिनिधी द्यावे, त्या प्रतिनिधींनी मसुद्याला अंतिम स्वरूप द्यायचे आणि त्यानंतर जागावाटप सुरुवात होईल, असे ठरले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना जाब विचारावा?
या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने यासाठी एका अध्यक्षाची घोषणा केली, ती म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची, मात्र काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांची आहे. याबाबत त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले सुद्धा आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही विचारत आहोत, मसुदाच तयार झाला नाही, तोपर्यंत पुढची बोलणी होत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना विचारलं पाहिजे की, आपण युतीच्या विरोधात आहात का?, कारण प्रमुख पद युतीबाबत विरोध असलेल्या व्यक्तीला देण्यात आले. त्यामुळे युती होणार कशी?, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला असल्याचे देखील, धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :