सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Seat) निर्माण झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत चर्चेत राहिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची यंदाही राज्यात चर्चा आहे. भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजप जिल्हाध्यक्ष असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात आणून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.  दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


माढा लोकसभेत नवीन ट्विस्ट


माळशिरसमधील उत्तम जानकर यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तम जानकर यांनी काल धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली होती. उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु असतानाच माढा लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.डॉ. अनिकेत देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे, अशी माहिती आहे.


अनिकेत देशमुखांकडून तयारी सुरु


माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, महादेव जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याच्या अगोदर डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. जेव्हा उमेदवार नव्हता तेंव्हा शरद पवार यांनी आमच्या नावावर चर्चा सुरू केली होती. पण निष्ठावंत उमेदवार असताना भाजप कडून उमेदवार आयात केला आणि आमची फसवणूक केली, असं अनिकेत देशमुख म्हणाले आहेत. दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता आहे. अनिकेत देशमुख  यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली असून. मी जिंकण्यासाठी उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   


माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यश येतं का ते पाहावं लागेल.  शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील देखील यामध्ये लक्ष घालू प्रश्न सोडवतात का हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.  


संबंधित बातम्या : 


पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु


Kolhapur Loksabha : 17 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा!