मुंबई : राज्यातील लक्षवेधी जागांवर आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. बारामती (Barmati), सांगली(Sangli) , सातारा (Satara) याठिकाणचे उमेदवार आज अर्ज दाखल करतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मविआ आणि महायुतीकडून शक्तिप्रदर्शन केलं जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devndra Fadnavis) नेतृत्वात महायुतीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तर सातारा आणि सांगलीतही महायुती (Maha yuti) आणि महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार ह्या एकमेकींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यातील कौन्सिल हॉल मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दोघींचे म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येतील. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे देखील अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचे अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण,शिवसेना नेते खासदार संजय राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते याप्रसंगी उपस्थित असणार आहेत. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडी मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे.
सुनेत्रा पवारांचा अर्ज भरून झाल्यानंतर महायुतीची सभा
बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरून झाल्यानंतर महायुतीची देखील सभा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेला उपस्थित असणार आहेत. महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज साधारणपणे सकाळी अकराच्या दरम्यान दाखल करण्यात येतील. उमेदवारी अर्ज भरताना मोजकेच पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत असणार आहेत.
उदयन राजेंची साताऱ्यात सभा
उदयन राजे सकाळी 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, यावेली सातारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन उदयनराजे अर्ज दाखल करणार आहेत.
सुनील तटकरे अलिबागला दाखल करणार अर्ज
सुनील तटकरे अलिबागला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात भूमीका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी केला आहे. ही निवडणूक जरी लोकसभेची असली तरी याचे पडसाद विधानसभा निवडणुकांवर पडताना पाहायला मिळतील.
हे ही वाचा :
Ajit Pawar: EVM मध्ये कचाकचा बटण दाबा, नाहीतर आमचा हात आखडता येईल : अजित पवार