कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापुरातील 220 माजी नगरसेवक आणि 17 माजी महापौर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. न्यू पॅलेसमध्ये झालेल्या मेळाव्यात या सर्व माजी नगरसेवक,महापौर यांनी उपस्थिती राहून शाहू महाराज यांचा प्रचार करण्याचा निर्धार केला.
दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या वतीने माजी नगरसेवकांचा मेळावा घेऊन 105 नगरसेवकांनी पाठिंबा दिला असताना आज शाहू महाराज छत्रपती यांना इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी पाठिंबा दिला. या मेळाव्यात कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा असून कोल्हापूरचे पुरोगामित्व वाचवण्यासाठी शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी
आमदार सतेज पाटील यांनी नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर सांगितले की, कोल्हापुरात 18 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. प्रत्येक गावामध्ये जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे. तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही बोलला नाही, तर मीही बोलणार नसल्याचे ते म्हणाले. राजकीय लढाईत टीकेला उत्तर आमच्याकडून निश्चित मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचा प्रवाह कोणाच्या बाजूने आहे हे सर्वांना माहीत असल्याचेही ते म्हणाले.
तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतं?
संजय मंडलिक यांनी केलेल्या टीकेवरून ते म्हणाले की, कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडे कोल्हापूरची जनताच शाहू महाराजांचा फॉर्म भरायला आली होती. पायाखालची वाळू कोणाच्या सरकाय लागली हे आता लक्षात आलं आहे. जनमत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात वारंवार यावं लागत आहे. दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतं? अशी विचारणा त्यांनी केली.
सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार, माढा लोकसभेत तुतारी वाजणार
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. लोकं त्यांना मतदान करणार नाहीत, निधी देतो मतदान द्या याचा अर्थ त्यांना खात्री मतदान मिळणार नाही, अशी खात्री असल्याची टीका त्यांनी केली. सतेज पाटील यांनी सोलापूर आणि माढावर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या मतावर भाष्य केले. ते म्हणाले की, माझ्या मते सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार, माढा लोकसभेत तुतारी वाजणार आहे. महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. वेगवेगळे सर्व्हे येत आहेत. मात्र, काही माध्यमांची आकडेवारी पाहिली तर 586 जागांच्या आसपास येत आहे. लोकसभेचे खासदार 543 आहेत असणं अपेक्षित असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या