MVA Seat Sharing: मविआचं ठरलं! प्रकाश आंबेडकरांना 24 तासांची डेडलाईन, संध्याकाळपर्यंत निरोप आला तर ठीक, अन्यथा....
Loksabha Election 2024: महाविकास आघाडीने बऱ्याच आधी लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु केली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त जागांचा प्रस्ताव मांडल्याने मविआच्या नेत्यांसमोर काय करायचे, हा पेच निर्माण झाला होता.
अकोला: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही सुटायला तयार नाही. भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर होऊन बरेच दिवस उलटले तरी मविआच्या जागावाटपाचं (MVA Seat Sharing) गुऱ्हाळ अजूनही सुरुच आहे. यासाठी प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी सोबत येणार की नाही, याबाबत असलेला संभ्रम कारणीभूत ठरत आहे. प्रकाश आंबडेकरांनी मविआसमोर थेट 27 जागांचा प्रस्ताव मांडत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे मविआच्या जागावाटपाचे घोडे अडून बसले आहे. प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. एकीकडे संजय राऊत (Sanjay Raut) हे वंचित आमच्यासोबत येईल, असे वारंवार सांगितले तरी प्रकाश आंबेडकर तितक्याच तत्परतेने, अद्याप आमचं काहीच ठरलं नाही, असे सांगत आहेत. या सगळ्यामुळे वंचित पक्ष आपल्यासोबत येण्याच्या मविआच्या नेत्यांच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. आता फक्त ही संभाव्य युती तुटली, असे जाहीर करुन चर्चा फिस्कटवण्याचा आळ स्वत:वर कोण घेणार, यासाठी बहुधा दोन्ही पक्ष एकमेकांची वाट पाहत असावेत. परंतु, लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने आता मविआनेच पहिले पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. मविआकडून आता प्रकाश आंबेडकर यांना २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी संध्याकाळपर्यंत प्रकाश आंबेडकर यांची वाट पाहणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रकाश आंबेडकरांकडून येणाऱ्या निरोपाची वाट पाहिली जाईल. त्यानंतर महाविकास आघाडी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीसोबत येण्यावर आंबेडकरांच्या नवनवीन अटी शर्तींमुळे ते महाविकास आघाडीसोबत येणार की नाही?, याबाबत मविआला शंका आहे. त्यामुळे मविआने आता हा सस्पेन्स संपवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबद्दल आंबेडकरांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आला आहे. ही शेवटची संधी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा स्वतंत्र प्रचार सुरु
प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या नेत्यांकडून जागावाटप अंतिम होण्याची वाट न पाहता एकट्यानेच प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या त्यांच्या सभा सुरु आहेत. या सभांमध्ये ते पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका करत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा घेण्यात आली होती. त्यावेळीही प्रकाश आंबेडकर यांनी, ' आपण एकत्र असू किंवा नसू पण आपल्याला भाजपविरोधात लढायचे आहे', असे वक्तव्यही केले होते.
आणखी वाचा
वंचितला नव्याने प्रस्ताव नाही, जो दिला त्यावर प्रकाश आंबेडकर चर्चा करतील; संजय राऊतांची स्पष्टोक्ती