Amol Kolhe: तुम्ही शिवाजी महाराजांची भूमिका केली अन् आज त्यांच्याच गादीच्या विरोधात प्रचारात?; अमोल कोल्हे म्हणाले...
सातारा लोकसभेची महायुतीने उमेदवारी कशी दिली हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणं उचित ठरणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
सातारा: एखादा योद्धा शरण येत नसेल तर त्याला घेरण्यात येतं, बदनाम करण्यात येत. सध्या सातारा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या बाबतीत हेच घडतंय. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आलो आहे, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले.
महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घेतला आहे आपकी बार हद्दपार याची जाणीव झाल्यामुळेच पंतप्रधान सातत्याने सहभाग घेत आहेत. याचा त्यांना आधीच अंदाज आला. त्यामुळेच महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात यांनी घेतली आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना महाराष्ट्र स्वीकारत नाही हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभा घेत आहेत, असा दावाही अमोल कोल्हे यांनी यावेळी केला.
तुम्ही शिवाजी महाराजांची भूमिका केली आणि आज त्यांच्याच गादीच्या विरोधात प्रचारात उतरला आहात?, असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. यावर मी राजघराण्याच्या विरोधात अजिबात नाही. सध्याची निवडणूक ही भारतीय जनता पक्षविरुद्ध सर्वसामान्य नागरिक अशी आहे. त्यांचे बेरोजगारी महागाई शेतकरी आत्महत्या हे विषय मांडण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. मुळात सातारला संसदेमध्ये दोन खासदार पाठवायची संधी आली आहे. एक उदयनराजे भोसले राज्यसभेत आणि दुसरे शशिकांत शिंदे लोकसभेत.
देशात इतर ठिकाणी एक खासदार निवडला जाईल. मात्र सातारकरांना दोन खासदार निवडायची संधी आली ती त्यांनी अजिबात सोडू नये, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी एकीकडे कोल्हापूरमध्ये म्हणते महायुतीने गादीला न्याय द्यायला हवा होता आणि दुसरीकडे महाविकास आघाडी साताऱ्यात राजगादीच्या विरोधात उमेदवार उभा करते?, असं विचारल्यास सातारा लोकसभेची महायुतीने उमेदवारी कशी दिली हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणं उचित ठरणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.
अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिलाय-
अभिजीत पाटील खुशी खुशी भाजपला पाठिंबा द्यायला गेले नाहीत. तर त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली जात आहे. इंदोरमधल्या एका उमेदवाराची 17 वर्षांपूर्वीची एक केस समोर आणली आणि त्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली. सातारा लोकसभेमध्ये 2009 चा एक गुन्हा समोर आणण्यात आला. आता मला प्रश्न पडला आहे. 2014 ते 2018 चे मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांची यावर कारवाई करायची जबाबदारी नव्हती का? त्या प्रकरणात ज्या पणन मंत्र्यांना सही केली त्यावर तुम्ही काय कारवाई केली ते सांगा?, असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप
अजित पवार यांनी बारामतीच्या प्रचारासाठी 13 ते 15 आरोपींना जामीन देऊन बाहेर आणला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात जी माणसे फिरत आहे त्यांची पार्श्वभूमी चेक केली तर लक्षात येईल मागच्या काही दिवसात तुरुंगातून जामीन मिळाल्यांची संख्या मोठी आहे. किमान 13 ते 15 आरोपी जेल मधून जामीन देऊन सोडण्यात आले आहे. मोठ्या गुन्ह्यातले हे सगळे आरोपी आहेत. हे आरोपी बूथ कॅप्चरिंगसारखे प्रकार करणार नाहीत ना अशी आम्हाला आता भीती वाटत आहे.