Lok Sabha Election : रामाच्या नावाने संघ परिवाराचा जनसंपर्क अभियान; लोकसभेत भाजपला फायदेशीर ठरणार का?
Lok Sabha Election 2024 : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने संघ परिवारातील संघटनांनी देशात राबवलेल्या महाजनसंपर्क अभियानाच भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होईल का?
Lok Sabha Election 2024 : भाजप (BJP) किंवा एखाद्या इतर राजकीय पक्षालाही (Political Party) जमणार नाही, ते संघ परिवारातील संघटनांनी करून दाखवलंय. त्याच कारण म्हणजे संघ परिवाराने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्यापूर्वी (Ram Mandir Inauguration) देशातील लाखो लोकांशी जनसंपर्क केला आहे. त्यामुळे रामाच्या नावाने संघ (RSS) परिवारातील संघटनांचा महाजनसंपर्क येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) भाजपला फायदेशीर ठरणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. राम जन्मभूमी येथे राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने संघ परिवारातील संघटनांनी देशात राबवलेल्या महाजनसंपर्क अभियान आणि त्या संदर्भात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील अहवालातून हे समोर आले आहे.
सध्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय बैठक नागपूर येथे सुरू असून, त्यामध्ये जो अहवाल मांडण्यात आला आहे, त्यानुसार श्रीरामासाठी संघ परिवाराने राबवलेल्या जनसंपर्क अभियान आजवरचा देशातील सर्वात मोठा जनसंपर्क अभियान ठरला आहे. याच फायदा आता भाजपला होण्याची शक्यता आहे.
संघाच्या जनसंपर्क अभियानाचे आकडे काय सांगतात?
22 जानेवारीला राम जन्मभूमी येथे राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. तसेच 22 जानेवारीच्या पूर्वी ही देशातील कोट्यवधी लोकांशी संपर्क साधून राम दर्शनाला येण्यासाठी अक्षता देण्यात आल्या होत्या. संघाच्या वार्षिक अहवालानुसार संघ परिवाराने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्यापूर्वी देशातील तब्बल 5 लाख 98 हजार 778 गावात ( देशातील एकूण गावांच्या संख्येचे 90% गाव) संपर्क साधून 19 कोटी 38 लाख 49 हजार 71 कुटुंबांना राम दर्शनाला येण्यासाठी अक्षता आणि निमंत्रण दिले होते. एवढेच नाही तर 22 जानेवारी रोजी प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभरात तब्बल 9 लाख 85 हजार 625 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यामध्ये 27 कोटी 81 लाख पेक्षा जास्त हिंदूंना सहभागी करण्यात आलं होतं. त्यामुळे संघाचा हा अत्यंत प्रचंड जनसंपर्क अभियान येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मदतीचा ठरेल का?, देशातील कोट्यवधी घरापर्यंत श्री राम मंदिराचा मुद्दा घेऊन जाणे हे भाजपच्या पथ्यावर पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संघ परिवाराचा महाजनसंपर्क अभियान कसा होता...
- राम मंदिरात दर्शनासाठी या उद्दिष्टाने देशातील 5 लाख 78 हजार 78 गावात संपर्क
- ही संख्या देशातील एकूण गावांच्या तुलनेत 90 टक्के आहे.
- 19 कोटी 38 लाख 49 हजार 71 कुटुंबांना अक्षता देऊन निमंत्रण दिले.
- त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे सुमारे 45 लाख स्वयंसेवक कार्यरत होते.
- 22 जानेवारी रोजी देशभरात 9 लाख 85 हजार 625 ठिकाणी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात आला.
- 22 जानेवारी रोजी देशभरात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये तब्बल 27 कोटी 81 लाख 54 हजार 665 हिंदू सहभागी झाले.
इतर महत्वाच्या बातम्या :