बाळासाहेब थोरातांची पावले भाजपच्या दिशेने? सुजय विखेंनी तो मिसिंग फॅक्टर हेरला, म्हणाले...
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Election) राज्यातील मोठे नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या ट्वीटनंतर त्याला आणखी खतपाणी मिळालं.
Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Election) राज्यातील मोठे नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या ट्वीटनंतर त्याला आणखी खतपाणी मिळालं. त्याशिवाय शरद पवारांचा विश्वासू नेताही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती. हे सर्व सुरु असतानाच भाजप खासदार सुजय विखे यांनी मोठं सूचक वक्तव्य केले आहे. बाळासाहेब थोरात हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असल्याचं सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी म्हटलेय. त्याशिवाय त्यांनी त्याचं कारणही सांगितलेय.
काय म्हणाले सुजय विखे पाटील ?
लोणावळा येथे पार पडलेल्या काँग्रेस कमिटीच्या मेळाव्या दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली होती, त्यावर भाजपाचे खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थोरातांबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे...बाळासाहेब थोरात भाजपात येतात असं माझ्या कानावर आलं आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या एक महिन्यात जेवढे कार्यक्रम झाले, त्यामध्ये एकाही कार्यक्रमाच्या बोर्डवर ना सोनिया गांधींचा फोटो आहे ना राहुल गांधींचा फोटो आहे. त्यामुळे वरचे नेत्यांचे फोटो गायब का झाले? याला दोनच कारण असू शकतात. माणूस एक तर दुसरीकडे जातोय किंवा त्यांचे फोटो टाकून ते पडतील अशी त्यांची भीती असेल, असा टोला देखील सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.
सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली; सुजय विखेंचा रोहित पवारांना टोला
रोहित पवार वारंवार आमचं घर फोडलं, असं म्हणत भाजपवर टीका करत आहेत यावरून भाजप खासदार सुजय विखे यांनी रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली ही म्हण त्यांच्यावर लागू होते. ज्यांनी सगळ्यांचीच घर फोडली. माझ्या सख्खे काकांना देखील कोणाच्या स्टेजवर कोण घेऊन गेले. त्याचबरोबर बीड असेल असे किती घरे ज्यांनी फोडले आज त्यांचं घर फुटलं तर हे बोलतात, हा एक कर्मा असतो जो जसं करेल त्याला तसं भोगाव लागेल आणि ते भोगत आहेत असा घणाघात सुजय विखे पाटलांनी रोहित पवारांवर केला आहे.
कांदा निर्यात बंदीवर काय म्हणाले ?
केंद्र सरकारने कांदा निर्यात वरील बंदी उठवल्यानंतर भाजप खासदार सुजय विखे यांचा अहमदनगरच्या नेप्ती कांदा बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारण हे विश्वासावर असत केवळ निवेदन देऊन फोटो काढणारे आम्ही नाहीत दुधाचे अनुदान देण्याचा निर्णय आमच्याच सरकारने घेतला , कांदा निर्यात बंदी उठवायचा निर्णय आम्हीच घेतला असं म्हंटले आहे.कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि व्यथा अमित शहा यांच्यापुढे मांडण्यात आम्हाला यश आलं आणि केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली.खा.सुजय विखे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवावी अशी विनंती केली, मात्र केवळ बैठकीत निर्णय झाला तसा जीआर काही निघाला नाही यावरून विरोधकांनी सुजय विखेंवर निशाणा साधला होता. या टीकेला देखील सुजय विखेंनी प्रत्युत्तर देत आम्ही काम केलं तरी विरोधकांना अडचण आहे आणि काम केलं नाही तरी अडचण आहे असं म्हंटल आहे.