MVA seat sharing: राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, शरद पवारांशीही बोलणं झालं; महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा
MVA seat sharing: महाविकास आघाडीतील लोकसभा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी फोनवरुन चर्चा केली.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चेने वेग घेतला आहे. महाविकास आघाडीत लोकसभेच्या 40 जागांवर एकमत झाले असले तरी 8 जागांचा तिढा काही केल्या सुटायला तयार नव्हता. हा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वत:हून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरुन जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेतून 8 जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल, अशी चर्चा आहे. येत्या 27 आणि 28 तारखेला लोकसभा जागावाटप संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युलावर (MVA Seat Sharing) शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राहुल गांधी-उद्धव ठाकरेंमधील जागावाटपाची चर्चा सकारात्मक
राहुल गांधी यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्याच्या एक दिवस आधी राहुल यांनी शरद पवार यांच्याशीही जागावाटपाबाबत चर्चा केली. या चर्चेचे फलित सकारात्मक असल्याचे समजते. लोकसभेच्या ज्या 8 जागांवरुन तिढा आहे, त्याविषयी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याशिवाय, काँग्रेस पक्ष मुंबईतून लोकसभेच्या तीन जागा लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत कशाप्रकारे सामावून घ्यायचे, याबाबतही उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याच चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत कोणत्या 8 जागांवरुन तिढा?
ठाकरे गटा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा लढेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गट 23 जागांसाठी आग्रही आहे. यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. तर घटकपक्षांसाठी दोन-दोन जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत ज्या 8 जागांवरुन तिढा आहे त्यामध्ये रामटेक, हिंगोली, जालना, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्यम मुंबई, शिर्डी, भिवंडी आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
आणखी वाचा
मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, रावेर अन् जळगावचा तिढा सुटला, लवकरच घोषणेची शक्यता