Pune News: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर पुण्यात उतरण्याचं ठिकाण ऐनवेळी बदललं, नेमकं काय आहे कारण?
Pune News: कार्ला गडावरील हेलिपॅड ऐवजी आता मावळमधील टाटा धरणावरील हेलिपॅडवर उतरवणार आहेत.
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) घेऊन पुण्यात येणारं हेलिकॉप्टर उतरण्याचं ठिकाण ऐनवेळी बदलण्यात आलेलं आहे. कार्ला एकविरा गडावरील हेलिपॅड सुरक्षित नसून इथं उतरणं हे धोक्याचं असेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळं कार्ला गडावरील हेलिपॅड ऐवजी आता मावळमधील टाटा धरणावरील हेलिपॅडवर उतरवणार आहेत. तिथून एकनाथ शिंदे आणि अजित पवार बायरोडने ते कार्ला गडावर विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत. अशी माहिती शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (शुक्रवार) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अगोदर एकविरा देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन करतील. कार्ला गडावरील कार्यक्रमानंतर ते आज दुपारी 2 वाजता कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण करतील. तसेच लायन्स व टायगर पॉइंट ग्लास स्काय वॉकचे भूमिपूजन करतील. त्यानंतर तालुक्यातील पवना व इंद्रायणी नदीवरील पूल व विविध विकासकामांचे एकाच ठिकाणावरुन भूमिपूजन व लोकार्पण करतील.
मुख्यमंत्री घेणार एकविरा देवीचे दर्शन
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शुक्रवारी) मावळ दौऱ्यावर असून यात ते कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गडावरील पायऱ्यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरूस्ती या कामांचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.