(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंचा सोमय्यांकडून माफिया म्हणून उल्लेख, शिंदे गटाने व्यक्त केली नाराजी
kirit somaiya on uddhav thackeray: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला आहे.
kirit somaiya on uddhav thackeray: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला आहे. यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी एक ट्वीट केले. ज्यात त्यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं आहे की, ''मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन केले.''
मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022
याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये.'' यावर आपली प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले आहेत की, ''अशा प्रकारची प्रतिक्रिया आपआपल्या पक्षाचे लोक देत असतात. यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.''
ते म्हणाले आहेत की, ''मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांचं कौतुक केलं. ज्या सरकारमधील काही लोकांच्या डोक्यात सत्तेचा मज गेला होता. ते सत्तेचा दुरुपयोग करत होते. ही एक प्रकारची माफियागिरी होती. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्याचं कुटुंब हत्या करणाऱ्याला माफियाच म्हणणार ''
याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ''आम्ही जेव्हा मुंबईत आलो त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याह सर्व आमदार आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. ज्याला देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. त्या बैठकीत मला बोलण्याची संधी मिळाल्यावर मी विनंती केली होती की, आमचे नेते उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही अन्य नेत्यांच्या बाबतीत वक्तव्य करण्यात येऊ नये. त्यांनी ती विनंती मान्य केली होती. त्यांनी (देवेंद्र फडणवीस यांनी) स्वतः भाजप कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून सांगितलं होतं की, जे जेष्ठ नेते असतात, त्यांच्याशी राजकीय वाद होऊ शकतो. परंतु कोणीही त्यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करू नये. असं त्यांनी स्पष्ट सागितलं होतं.'' ते म्हणाले, ''आज जे घडलं त्याबद्दल आमचं जे ठरलं होतं ते आम्ही फडणवीस यांना सांगू. सोमय्या हे भाजप नेते आहेत, त्यांना फडणवीस काय ते सांगतील. हे जे घडलं आहे, ते आम्हाला कोणालाही आवडलं नाही.''