Karuna Sharma: सुरेश धस- धनंजय मुंडेंची 'मांडवली' झाल्याची चर्चा, पण करुणा शर्मांनी वेळ हेरली, म्हणाल्या, ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची वेळ आलेय!
Karuna Sharma Suresh Dhas: धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर आता करुणा शर्मा यांनी देखील टीका केली आहे.

Karuna Sharma Suresh Dhas: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे मुंडे यांना भेटल्याचे समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. तसेच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात आता समेट झाला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर आता करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी देखील टीका केली आहे.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवर करुणा शर्मा म्हणाल्या की, एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाली आहे आणि आज जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यात वाद सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे भेटीसाठी बोलावतात आणि मग म्हणतात की भेट झाली. या संपूर्ण विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. हा मुद्दा दाबायचा आहे, दिशाभूल करायची आहे आणि वाद पेटवायचा आहे, ही त्यांची योजना आहे, अशी टीका करुणा शर्मा यांनी केली आहे.
'ब्रह्मास्त्र' बाहेर काढण्याची चांगली वेळ-
खूप गंभीर आणि खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाली आहे आणि तुम्ही त्यात मध्यस्थी करता, हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. लवकरच देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करून त्यांना धनंजय मुंडेंविरोधात सर्व पुरावे देणार आहे, असंही करुणा शर्मा म्हणाल्या. तसेच ब्रह्मास्त्र काढण्याची चांगली वेळ आलीय, असंही करुणा शर्मा यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर सुरेश धस काय म्हणाले?
धनंजय मुंडेंच्या ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी भेटलो, त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणं यात गैर नाही.संतोष देशमुख प्रकरण व तब्येतीची विचारपूस करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परवाच्या दिवशी भेटलो...भेटीनंतर बाहेर आल्यावर काय केलंय, हे तुम्हाला माहिती आहे. मुंडेंना रात्रीचं त्यांना दवाखान्यात नेले होते. मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं व न घेणं याचा अधिकार अजित पवारांचा आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. तसेच माझा लढा सुरुच राहणार आहे, असंही सुरेश धस म्हणाले.
संबंधित बातमी:
सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीचा काहीही परिणाम होणार नाही, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

