(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा
JP Nadda Statement on RSS: शुरु मे हम अक्षम होंगे, थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये है, सक्षम है, तो बीजेपी अपने आप चलती है, असं वक्तव्य जेपी नड्डा यांनी केलं आहे.
JP Nadda Statement on BJP and RSS: नवी दिल्ली : आता आम्ही सक्षम, भाजप पक्ष आमचा आम्ही चालवतो, असं भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले आहेत. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जेपी नड्डा (JP Nadda) यांनी हे वक्तव्य केलं आहे. वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधांवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना जेपी नड्डा यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच, आधी असक्षम होतो, म्हणून संघाची गरज पडत होती, असंही जेपी नड्डा म्हणाले आहेत. यासोबतच मथुरा, काशीतल्या मंदिर बांधणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नव्या मंदिरनिर्माणाचा ना विचार, ना कल्पना, ना इच्छा, असंही जेपी नड्डा म्हणाले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बोलताना म्हणाले की, "शुरु मे हम अक्षम होंगे, थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये है, सक्षम है, तो बीजेपी अपने आप चलती है, असं वक्तव्य जेपी नड्डा यांनी केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय? असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जेपी नड्डा यावेळी विसरले नाहीत.
RSS एक सांस्कृतिक, सामाजिक संघटना आणि भाजप एक राजकीय संघटना : जेपी नड्डा
भाजपला आता आरएसएसच्या पाठिंब्याची गरज नाही का? असं विचारल्यावर पुढे बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, "पाहा, पक्ष वाढला आहे आणि प्रत्येकाला आपापली कर्तव्ये आणि भूमिका मिळाल्या आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे आणि आम्ही एक राजकीय संघटना आहोत, हा गरजेचा प्रश्न नाही. ती एक वैचारिक आघाडी आहे... वो वैचारिक दृष्ट्या अपना काम करते हैं, हम अपना. आम्ही आमचे व्यवहार आमच्या पद्धतीनं हाताळत आहोत. आणि हेच राजकीय पक्षांनी केलं पाहिजे."
मथुरा,काशीतल्या मंदिर बांधण्याचा विचार नाही : जेपी नड्डा
काशी आणि मथुरेतील वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याचा आमचा कुठलाही प्लॅन नाही, असं भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले आहेत. ना अशी कुठली संकल्पना आहे, ना इच्छा आहे, ना नियोजन... पक्षाचा फोकस हा महिला, दलित, गरिब आणि तरुणांचा विकास करण्यावर आहे, हे खुद्द मोदींनी ठरवलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मात्र, योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिश्व शर्मांसारखे नेते वेळोवेळी काशी, मथुरेचा उल्लेख करतात याची आठवण नड्डा यांना करून दिल्यावर त्यांनी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. राम मंदिर प्रत्यक्षात उभारण्यात आल्यानं काही नेते भावूक होतात किंवा भावनेच्या भरात बोलून जातात, असं सूचक उत्तरही यावेली जेपी नड्डा यांनी दिलं आहे.