Rohit Pawar: शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र केसरी' पुन्हा भरवा; आमदार म्हणाले, कर्जत जामखेडमध्ये पैलवानांना लढवा
Rohit Pawar: महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जामखेडमध्ये घ्यावी अशी मी विनंती केली आहे.

Maharastra Kesari 2025 : राज्यात सध्या फक्त महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाची चर्चा दिसून येत आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम विजेता पृथ्वीराज मोहळ ठरला. शेवटच्या फेरीत कुस्तीसाठी महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe)भोवलं आहे. शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने (Maharashtra State Wrestling Association) घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. तर पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharastra Kesari 2025 Winner) ठरला आहे. पण शिवराज राक्षे याला वादग्रस्त पद्धतीने बाद जाहीर केल्याने मोठा वाद उद्भवला आहे. त्याबाबत आज माध्यमांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांना प्रतिक्रिया दिली आहे.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्तीचे ज्यांनी आयोजन केले ती संघटना तीन वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही दुसरी संघटना आहे. जी संघटना 70ते 80 वर्ष झाले या क्षेत्रात काम करत आहे आणि महाराष्ट्र केसरीचे आयोजन हे ती संघटना करत असते. अहिल्यानगर मधील महाराष्ट्र केसरी कुस्तीचे आयोजन हे पैलवानांसाठी होते की नेत्यांसाठी हेच कळत नव्हते तिथे पैलवान कमी आणि पंच कमी आणि नेतेच जास्त होते. ती कुस्ती कुठल्यातरी पैलवानाला जिंकवण्यासाठी घेतली होती का काय हे कळत नव्हते. जो निकाल लागला यामध्ये सुद्धा पैलवानावर अन्याय झाला हे सगळं योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कर्जत जामखेडमध्ये घ्यावी अशी मी विनंती केली आहे. कुठल्याही पैलवानाला जिंकवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेणार नाही. जर ही गोष्ट मान्य केली तर खरी महाराष्ट्र केसरी मार्च अखेर आपल्याला बघायला मिळेल, असं रोहित पवारांना म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
अहिल्यानगर मध्ये जी कुस्ती झाली ज्यांनी त्या कुस्तीच्या आयोजन केलं ती महाराष्ट्र कुस्ती संघटना तीन वर्षापूर्वी ती संघटना स्थापन झाली. दुसरी संघटना आहे तिचं नाव आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही 70 ते 80 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करत आलेली आहे, आणि महाराष्ट्र केसरी ते आयोजित करतात. परवा जी काही संघटना अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी आयोजित केली ती पैलवानांसाठी केली होती का नेत्यांसाठी हेच कळत नाही, तिथे जिथे मॅच ठेवली होती जिथे कुस्ती चालू होती तिथं तज्ञ कमी आणि पंच कमी मात्र, नेते जास्त अशी परिस्थिती तिथे होती.
त्याचबरोबर तिथे ज्या प्रकारे कुस्ती आयोजित केली होती, ती कुठल्यातरी पैलवानाला जिंकवण्यासाठी केली होती का असा देखील सवाल उपस्थित होतो आहे. त्याच्याबरोबर जे महाराष्ट्रातील सर्व पूर्वीचे महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. त्याचा मानसन्मान तिथे कुठे ठेवलं नव्हतं. त्यामुळे अतिशय चुकीच्या पद्धतीने ते झालं काही नियम असे बदलले, त्याला काही अर्थ राहिला नाही. आता या सर्व गोष्टी बघितल्यानंतर जो काही निकाल लागला त्यामध्ये सुद्धा अन्याय झालेला आहे असं वाटतं, मग हे सगळं जे काही चाललेलं आहे योग्य वाटत नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरी परत एकदा आणि ते सुद्धा परिषदेच्या माध्यमातून सत्तर वर्ष जी परिषद सुरू आहे त्याच्या माध्यमातून कर्जत जामखेड मध्ये घ्यावी अशी मी विनंती केली आहे आणि कुठल्याही पैलवानाला जिंकण्यासाठी आम्ही महाराष्ट्र केसरी घेणार नाही, पण शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पैलवानांना खऱ्या अर्थाने निष्पक्षपणे व्यासपीठ देणार आहोत, असंही पुढे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.























