Zeeshan Siddique: काँग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तर वांद्र्यात सांगलीची पुनरावृत्ती; झिशान सिद्दीकी विशाल पाटलांचा पॅटर्न वापरणार
Maharashtra Politics:महाविकास आघाडीने बांद्रा पूर्व येथून उमेदवारी नाकारली तरी त्याच मतदारसंघातून मी उमेदवारी लढणार, झिशान सिद्दिकी यांचा निर्धार. झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. मविआने वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास या मतदारसंघातील काँग्रसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचा पत्ता गट होणार, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी काँग्रेस पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर वांद्रे पूर्व मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली नाही तर इथेदेखील सांगलीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे झिशान यांनी म्हटले.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षांच्या चर्चा सुरु आहेत. मुंबईतील सर्व विधानसभेची चाचपणी सुरू असताना महाविकास आघाडीतील शिवसेना यांनी वांद्रे पूर्व या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. या मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांचे नाव सध्या तरी चर्चेत आहे. मात्र, काँग्रेसने मला या मतदारसंघातून संधी नाकारली तर मी विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढेन, असा पवित्रा झिशान सिद्दिकी यांनी घेतला आहे.
झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशापूर्वी अजित पवार हे झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयात होतो. यावेळी झिशान सिद्दिकी यांची अजितदादांच्या स्वागतासाठी लगबग सुरु असल्याचे दिसून आले होते. झिशान यांनी अजितदादांना कार्यालयातील आपल्या खुर्चीत अजित पवार यांना आग्रहाने बसवले होते. यानंतर काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी केली होती.
झिशान सिद्दिकी नेमकं काय म्हणाले?
मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नक्की मागेल. जर ही जागा काँग्रेसने ठाकरे गटासाठी सोडली तर इथेदेखील परिस्थिती सांगली सारखीच होऊ शकते. किती काय झालं तरी आम्ही या मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.
विधानपरिषदेत मत फुटल्याच्या आरोपाला उत्तर
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची सात ते आठ मतं फुटल्याचे स्पष्ट झाले होते. या फुटलेल्या मतांमध्ये झिशान सिद्दीकी यांच्या मताचा समावेश असल्याचा अंदाज आहे. काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी यासंदर्भात आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, एक आमदार टोपीवाला आहे, त्याचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असे सांगत गोरंट्याल यांनी अप्रत्यक्षपणे झिशान सिद्दिकी यांनी लक्ष्य केले होते. याला प्रत्युत्तर देताना सिद्दिकी यांनी म्हटले की, विधानपरिषदेत कोणाची मतं फुटली हे काँग्रेस पक्षाने कसे ओळखले? गेल्यावेळी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता तेव्हादेखील असेच म्हटले गेले. तेव्हाही कोणावरही कारवाई का झाली नाही, असे सवाल झिशान यांनी उपस्थित केले.
काँग्रेस पक्षात आमच्यासारख्या नवीन नेतृत्वाला त्रास देण्याचा काम सुरू आहे. जर वांद्रs पूर्व इथून उमेदवारी नाही दिली तरी आम्हाला तिथून निवडून यायचे आहे. कारण आम्हाला लोकांवरती विश्वास आहे. त्यामुळे जनता मला नक्कीच निवडून देईल, असा विश्वास झिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
मी आदित्यला मित्र मानायचो, ५० कॉल केले पण एकदाही फोन उचलला नाही: झिशान सिद्दीकी