(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray: अबकी बार भाजपा तडीपार! चारसो पार कसे जाता हे बघतोच; उद्धव ठाकरेंचं थेट मोदींना आव्हान
Uddhav Thackeray: आम्ही मोदींविरोधात नव्हे तर हुकूमशाही विरोधात एकत्र येत आहोत. आम्हाला देशातील लोकशाही टिकवायची आहे. देशाला वाचवणे हाच आपला धर्म आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर भाजपला दिल्लीचे तख्त राखता आले नसते. पण आता भाजपचे तख्त फोडावेच लागेल. अबकी बार भाजप तडीपार, हा आपला नारा असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण तुम्ही कसे 400 पार होता, हे मी बघतोच, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपसमोर दंड थोपटले आहेत. ते रविवारी धारावीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर चौफेर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी गेल्या 75 वर्षांमध्ये काँग्रेसने काय भ्रष्टाचार केला, हेच सांगत असतात. पण त्यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये सरकारी योजनांचे नामंतर करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 8000 कोटी रुपये जमवले आहेत. या पैशाचा वापर खोट्या जाहिराती करण्यासाठी होतो. मोदींकडून खोटे दावे आणि खोटे लाभार्थी असलेल्या योजनांचा प्रचार केला जातो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे देशात भाजपविरोधात प्रचंड खदखद आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ईव्हीएमध्ये घोटाळा करुन निवडणूक जिंकली तर देशात असंतोषाचा भडका उडेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
भाजपने जुमल्याचं नामंतर केलंय, आता त्याला गॅरंटी म्हणतात: उद्धव ठाकरे
आतापर्यंत भाजप मतदारांना जुमल्यांचा वापर करत होता.पण आता भाजपने त्याचही नामांतर केले आहे. आता भाजपकडून खोट्या जुमल्यांसाठी गॅरंटी हा शब्द वापरला जातो. कितीही पैसे खा, काहीही करा, पण भाजपमध्ये आल्यानंतर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, हीच त्यांची गॅरंटी आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
नितीन गडकरींसाठी उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग
या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाजूने जोरदार राजकीय फटकेबाजी केली. भाजपने काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही भाजपची अंतर्गत बाब आहे, मी त्यामध्ये जाऊ इच्छित नाही. या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांचे नाव आहे. पण सुरुवातीला आम्हाला मोदी, शाह ही नावं माहिती नव्हती. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी आम्हाला भाजपची ओळख करुन दिली. आमचे कौटुंबिक संबंध होते. यानंतर त्यांच्यासोबत नितीन गडकरी आले. गडकरी एक चांगला काम करणारा माणूस आहे. तेव्हापासून नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि पक्षाचा निष्ठावान कार्यकता म्हणून ओळखले जातात. पण भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत त्यांचे नाव नाही. पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश नव्हता. पण मग भाजपने पूर्वी मुंबईतील ज्या कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप केले होते त्यांनाच उमेदवारी दिली, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा
गुंडांच्या देशा, लाचार देशा, गद्दारांच्या देशा अशी महाराष्ट्राची ओळख बनलीये : उद्धव ठाकरे