आपसात भानगडी न करता न्यायालयानुसार कार्य करा; जरांगे पाटील आणि छगन भुजबळांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सल्ला
Gondia News : जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळांना आपसात कोणत्याही भानगडी न करता कोर्ट जो निर्णय देईल त्यानुसार कार्य करावे, असा सल्ला राज्याचे मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिला आहे.
Gondia News गोंदिया : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठ्यांचे नेतृत्व करतात. तर ओबीसींचे नेतृत्व हे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) करतात. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आपसात कोणत्याही भानगडी न करता कोर्ट जो निर्णय देईल त्यानुसार कार्य करावे, असा सल्ला राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम (Minister Dharmarao Baba Atram) यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना धमकी दिली आहे, की तुझा करेक्ट कार्यक्रम करतो. या धमकी प्रकरणावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणुकीत उभे राहण्याच्या अधिकार असल्याचीही ते यावेळी म्हणाले. ते गोंदिया येथे बोलत होते.
राजीनामा मंजूर न झाल्यामुळे गोंदियाच्या पालकमंत्रीपदी कायम
गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. परंतु राजीनामा मंजूर न झाल्यामुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्यामुळे आपण पालकमंत्री पदी कायम असल्याचे स्पष्टोक्तीही धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. प्रकृतीच्या कारणावरून आपण राजीनामा पक्षाकडे दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक बॅक फुटवर
सध्या विरोधकांना एकच काम उरले आहे, ते म्हणजे कोण शब्दामध्ये, भाषणांमध्ये चुकतो, हेच पाहत बसतात. लाडकी बहीण योजना ही आमदार रवी राणा यांची योजना नाही तर ती राज्य सरकारची योजना आहे. विधिमंडळामध्ये मंजूर करून ही योजना आणल्या गेली आहे. यासाठी चाळीस हजार कोटीची तरतूद राज्य शासनाने केली असून आता येणारा 17 तारखेला दोन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही नाही. मतदान करायचे की नाही, ही मतदारांची वैयक्तिक बाब आहे.
मात्र राज्य सरकारने चांगल्या योजना काढल्यामुळे विरोधक हे बॅक फुटवर गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते फॉर्म भरून महिलांना रांगेत लावून आता या योजनेच्या लाभ घेण्यासाठी सांगत आहेत. परंतु या योजनेचा लाभ विरोधकांना होणार नाही. तर तो महायुतीलाच होईल, असा टोला धर्मराव बाबा आत्राम यांनी विरोधकांना लगावला आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाने आमदार रवी राणांनी वक्तव्य केले होतं. त्या वक्तव्यावर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा