अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी भडास काढली!
अजित पवारांनी पालकमंत्री व्हायचे, तिथे त्यांनी बॉस व्हायचे, आदेश द्यायचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचे काम करायचे.. नको आम्हाला अशी सत्ता... अशी भावना भाजप उपाध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

पुणे : अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीतून (Mahayuti) बाहेर काढा, अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको... पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसवले आहे, असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये खदखद बोलून दाखवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी म्हणाले, अजित पवारांना या महायुतीतून बाहेर काढा, असे प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आहे. याला तुम्ही सल्ला समजलात तरी चालेल. अजित पवारांनी सुभाष बापू, राहुल दादांवर, योगेश अण्णांवर अन्याय केला आहे. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादांकडे आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे निधी मागायला गेले तर अजितदादा म्हणाले तुमचा काय संबंध आम्ही 10 टक्केच निधी देणार... अरे नको आम्हाला अशी सत्ता..
ज्या राष्ट्रवादीचा 10 वर्षे विरोध केला, तेच आमच्या बोकांडी
अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची अशीच परिस्थिती आहे. सोलापूरला कायम बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळाला आहे. स्वाभिमानी नेतृत्त्व पुणे जिल्ह्याला मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले आहे. ज्या राष्ट्रवादीचा गेली 10 वर्षे आम्ही विरोध करतोय तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी आणून ठेवली आहे. अक्षरश: कार्यकर्ते भीतीच्या वातावरणात आहे. अजित पवारांना कशासाठी सत्तेत घेतले आहे? असा सवाल देखील भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्षांनी केला आहे.
अजित पवार असतील तर विधानसभेची सत्ता आम्हाला नको...
भाजपच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून ते तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांपर्यंत महायुतीमध्ये अजित पवार आणि विधानसभेला सत्ता येत असेल तर ती सत्ता नको आहे, अशी भावना आहे. काय करायचे अशा सत्तेचे... अजित पवारांनी पालकमंत्री व्हायचे, तिथे त्यांनी बॉस व्हायचे आणि आदेश द्यायचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचे काम करायचे.. नको आम्हाला अशी सत्ता... अशी भावना भाजप उपाध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :
अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
