Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Gautam Adani meets CM Devendra Fadnavis: गौतम अदानी हे काहीवेळापूर्वी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: राज्यात महायुती सरकारची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाच्या कारभाराची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आपापल्या कामाला लागले आहेत. अशातच मंगळवारी मुंबईत एक महत्त्वाची घडामोड घडली. उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी 12 च्या सुमारास उद्योजक गौतम अदानी हे देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिल येथील सागर बंगल्यावर दाखल झाले. गौतम अदानी हे फडणवीसांना का भेटायला आले आहेत, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही सदिच्छा भेट असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप आणि गौतम अदानी यांच्या कनेक्शनवरुन टीकेची झोड उठवली होती. विशेषत: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कथित साटेलोटे असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय, मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरूनही अदानी आणि भाजप यांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो एकर जागा अदानींच्या घशात जाईल आणि स्थानिक रहिवाशांना निवास आणि रोजगार सोडून इतरत्र स्थलांतरित करण्याचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारंवार केला होता. उद्धव ठाकरे यांनीही धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मविआची सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, आता राज्यात महायुती एकहाती सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
अदानींच्या मुद्द्यावरुन संसदेत गोंधळ
दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी गौतम अदानी यांच्या मुद्दयावरुन गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी या आज संसदेत 'मोदी अदानी भाई-भाई' असा मजकूर लिहलेली बॅग घेऊन आल्या होत्या. यावरुन भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. सोनिया गांधी या जॉर्ज सोरोस याच्यासोबत हातमिळवणी करत भारतविरोधी अजेंडा चालवत आहेत. काँग्रेस देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप जे.पी. नड्डा यांनी केला.
आणखी वाचा
अदानी उद्योग समूहाने लाचखोरी, फसवणुकीचे सर्व आरोप फेटाळले, परिपत्रक काढून दिलं स्पष्टीकरण!
























