Gajanan Kirtikar U Turn : भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय, असं बोललोच नाही, कीर्तिकरांचा यू टर्न; वक्तव्य पुन्हा ऐका, राऊतांचा सल्ला
Gajanan Kirtikar U Turn :
Gajanan Kirtikar U Turn : शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी त्यांच्या आधीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळते, असं कीर्तीकर म्हणाले होते. मात्र आपण असं म्हणालोच नव्हतो. ते माझ्या माझ्या तोंडी टाकण्यात आला असं ते म्हणाले. मात्र गजानन कीर्तिकर यांच्या यू टर्नवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. कीर्तिकरांनी त्यांचं वक्तव्य पुन्हा जाहीरपणे ऐकावं असं राऊत म्हणाले.
ते शब्द माझ्या तोंडी टाकले : गजानन कीर्तिकर
भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, ते माझ्या तोंडात टाकलं. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात भाजप-शिवसेना युतीच नव्हती. महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तिच युती होती. शिंदे साहेबांनी उठाव करत भाजप-शिवसेनेची युती आणली. पुन्हा शिवसेना-भाजपचं सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले. आम्ही पुन्हा एनडीएचे घटक पक्ष झालो, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.
काय म्हणाले होते कीर्तिकर?
"आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, एनडीएचा घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटक पक्षाचा दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे," असं गजानन कीर्तिकर म्हणाले होते.
शिंदे-फडणवीस सरकारमधील धुसफूस समोर
गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफूस समोर आली होती. गजानन कीर्तिकर असं म्हणालेच नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची रात्री उशिरा बैठक देखील झाली होता. त्यानंतर आता गजानन कीर्तिकर यांच्याकडून सारवासारव करत या विषयावर पडदा टाकताना दिसत आहेत.
संजय राऊत यांचा कीर्तिकरांवर निशाणा
दरम्यान गजानन कीर्तिकर यांच्या यू टर्नवरुन संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "गजानन कीर्तिकर यांचं स्टेटमेंट मी ऐकलं आहे. त्यांनी पुन्हा ऐकावं, जाहीरपणे ऐकावं. आम्हाला सापत्न, सावत्रपणाची वागणूक मिळते, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. एनडीएमध्ये आम्हाला मान-सन्मान मिळत नाही. आम्हाला घटक पक्षाचा दर्जा नाही, हे गजानन कीर्तीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने म्हटलं आहे. त्यांची काय अवस्था झाली," असं राऊत म्हणाले.