...तर मुरबाड विधानसभेतून निवडणूक लढणार; कपिल पाटलांनी ठोकला शड्डू, किसन कथोरेंबाबतही मोठं वक्तव्य
Kapil Patil : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्यानंतर आता कपिल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे सुतोवाच केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत आतापर्यंत जागा वाटप झाले नसले तरी अनेक इच्छुकांकडून दावेदारी सुरु आहे. आता माजी खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
भाजप पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर आपण मुरबाड विधानसभा मतदारसंघातून (Murbad Vidhan Sabha Constituency) निवडणूक लढवणार, असे वक्तव्य माजी खासदार कपिल पाटील यांनी केले आहे. तसेच विद्यमान आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासाठी देखील काम करण्याची आपली तयारी असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले आहे.
लोकसभेच्या पराभवानंतरही कपिल पाटील मतदारसंघात सक्रीय
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या कपिल पाटील यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले होते. त्यानंतर कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या वाकयुद्ध सुरू असल्याचे दिसून आले होते. पराभवानंतरही कपिल पाटील मतदारसंघात सक्रीय आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे (Bhiwandi Lok Sabha Constituency) माजी खासदार पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कथोरे हे दोघेही भाजपमध्येच आहेत. मात्र, त्यांच्यातील संघर्ष अनेकदा दिसून आला आहे. लोकसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे कथोरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला होता.
...तर मुरबाड विधानसभेतून निवडणूक लढणार
पक्षाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून निवडणूक नक्की लढणार, अशी भूमिका आता पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान, बदलापूरचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे (Waman Mhatre) आणि मुरबाडमधील शिंदेसेनेचे सुभाष पवार (Subhash Pawar) यांनीदेखील आगामी विधानसभेकरिता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर कथोरे यांना अडचणीत आणण्यासाठी सुभाष पवार यांच्या माध्यमातून खेळी खेळली जात असल्याचे म्हटले जात आहे. आता भाजप पक्षश्रेष्ठी किसन कथोरे की कपिल पाटील, कुणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आधी खासदारकी गेली, आता पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल; माजी मंत्री कपिल पाटलांच्या अडचणीत वाढ