Presidential Election 2022: शरद पवारांनंतर आता फारुख अब्दुल्लांचीही माघार, जाणून घ्या काय आहे कारण
Presidential Election 2022: विरोधी पक्षांच्या दोन नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरण्यास नकार दिला आहे. सर्वात आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.
Presidential Election 2022: विरोधी पक्षांच्या दोन नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरण्यास नकार दिला आहे. सर्वात आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी माझे नाव पुढे केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच ज्या नेत्यांनी पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे त्यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, ''यावर बराच विचार केल्यानंतर, मला विश्वास आहे की जम्मू-काश्मीर सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, ज्याला सामोरे जाण्यासाठी माझ्या मदतीची आवश्यकता आहे. म्हणूनच या मी माझे नाव मागे घेत आहे. मी ममता दीदींचा आभारी आहे की, त्यांनी माझे नाव सुचवले आणि ज्या नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.''
टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी 15 जून रोजी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत फारुख अब्दुल्ला, गोपाळ कृष्ण गांधी आणि एनके प्रेमचंद्रन यांच्या नावावरही चर्चा झाली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार शोधण्याबरोबरच, एनडीएशी स्पर्धा करण्यासाठी विरोधकांना लक्षणीय मते मिळवावी लागतात.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित पहिले तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी किमान 5,43,216 मतांची आवश्यकता असेल. लोकसभेच्या 543 आणि राज्यसभेच्या 233 सदस्यांच्या मतांचे मूल्य 543200 आहे. सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या एकूण मतांचे मूल्य 543231 आहे. म्हणजेच संसद सदस्य आणि सर्व विधानसभेतील सदस्यांच्या एकूण मतांचे मूल्य 1086431 आहे.
देशाच्या सध्याच्या राजकारणात एनडीए आणि यूपीए या दोनच आघाड्या अस्तित्वात आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, एनडीएकडे सुमारे 48 टक्के मते आहेत आणि त्यांच्या उमेदवाराला विजयासाठी 10 हजारांहून अधिक मतांची आवश्यकता आहे. तर यूपीएकडे जवळपास 23 टक्के मते आहेत. संयुक्त विरोधी पक्षाचे बोलायचे झाले तर त्यांच्याकडे 51 टक्के मते आहेत.