Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसाठी कायपण, देवेंद्र फडणवीसांनी निर्णय फिरवला, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनच वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, हा निर्णय बदलण्यात येणार आहे.

मुंबई: राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये (Disaster Management Committee) समावेश करण्यासाठी नियमात बदल केला जाणार आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमात बदल केले जाणार आहेत.
मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो. त्यानुसार आता या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती. नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये स्थान मिळाले नव्हते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या कारणावरुन महायुतीत वितुष्ट निर्माण होऊ शकते, अशी चर्चा होती. त्यामुळे आता नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये सहभागी करुन घेण्याचा निर्णय झाला आहे.
गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अलीकडे पालकमंत्री पदाच्या वाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील आपल्या गावी निघून गेले होते. अखेर रायगड आणि नाशिकच्या जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियु्क्तीला स्थगिती देण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापनात नगरविकास खात्याची भूमिका ही कायमच महत्त्वाची ठरते. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित घटनास्थळापर्यंत पोहोचवली जाते. तरीही एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये न घेतल्याने चर्चांना उधाण आले होते.
एकनाथ शिंदेंना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’
एकनाथ शिंदे हे आजची मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर दिल्लीला जाणार आहेत. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे. दिल्लीत सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र सदनात हा गौरव पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पगुच्छ देऊन एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

