Eknath Shinde Party Symbol : ढालीने जनतेचं रक्षण करणार, कोणी अंगावर आल्यावर समोर तलवार धरणार; चिन्हावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Party Symbol : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सोमवारी शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं होत. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने त्यांना ढाल तलवार हे चिन्ह दिल आहे.
Eknath Shinde Party Symbol : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सोमवारी शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं होत. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने त्यांना ढाल तलवार हे चिन्ह दिल आहे. याबाबतच शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''आम्हाला एकदम योग्य चिन्ह मिळालं आहे.'' ते म्हणाले की, ''ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि कोणी अंगावर आलं तर तलवार समोर धरायची. ढाल आणि तलवार गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या काळापासून असून ही चांगली बाब आहे आमच्यासाठी.''
आग लावायचं चिन्ह आम्हाला नको होतं : गोगावले
भरत गोगावले म्हणाले की,''मराठी माणसाच्या लक्षात राहील असं हे चिन्ह आहे. आग लावायचं चिन्ह आम्हाला नको होतं. एखाद्याच्या हातातून मशाल पडली तर आग लागते.'' अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाचा उद्या उमेदवार जाहीर होऊ शकतो, अशी माहिती ही त्यांनी दिली आहे. यावरच प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे म्हणाले आहेत की, आम्हाला जे चिन्ह दिलं त्यावर आम्ही समाधानी आहोत. ढाल तालावर घेऊन आम्ही आता जनतेसमोर जाणार आहोत.
यावर शंभूराज देसाई यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, हिंदवी स्वराज स्थापन करताना शिवाजी महाराजांनी ज्या ढाल तलवारीचा वापर केला. ही ढाल तलवार अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात महाराजांनी वापरली, याचा उपयोग केला. हे प्रतीक आहे. त्यामुळे आम्हाला हे चिन्ह मिळाल्याचा आनंद आहे.
शिंदे गटाच्या चिन्हावर ठाकरे गटाने काय दिली प्रतिक्रिया?
शिंदे गटाच्या चिन्हावर बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना नवीन चिन्हासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, ''सामना सुरु होण्याआधी त्यांना शुभेच्छा. मात्र एक प्रश्न अनुत्तरित राहातो. एक म्यानात एकच तलवार राहू शकते. त्यांच्या चिन्हामध्ये दोन तलवारी आहेत. मग आता भाजप देवेंद्र फडणवीस यांची तलवार वापरणार की, एकनाथ शिंदे यांची वापरणार. मला वाटत भाजपच्या म्यानात फडणवीस यांच्याच तलवारीला स्थान असेल. मग शिंदे यांची तलवार कुठे जाणार.'' या चिन्हातील ढालीवर बोलताना त्या म्हणल्या की, ''आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असं म्हणत त्यांनी जी ढाल घेतली आहे, ती आपल्याच पक्षाशी केलेली गद्दारी लपवण्यासाठी त्यांनी ती ढाल घेतली आहे.''
संबंधित बातमी:
Eknath Shinde Party Symbol : शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय