Eknath Shinde : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत
Eknath Shinde : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका कधी होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे संकेत दिले आहेत. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
![Eknath Shinde : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत Eknath Shinde big statement on upcoming Maharashtra Assembly Election will conduct in November Marathi News Eknath Shinde : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/04/20b858a8381bc012a9bbb20c14db0e651725412435433989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार या संदर्भात अनेक चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, अशा देखील चर्चा झाल्या. मात्र, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक कधी लागणार याचा अंदाज देखील शिंदे यांनी वर्तवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांदीवली येथील एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीचे संकेत देण्यात आले. राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार दिलीप लांडे,अशोक माटेकर, किरण लांडे, शैलेश निंबाळकर, बाबू पुराणिक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चाव्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.
मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, महापालिका यांना दिले आहेत. पहिल्या टप्प्यात 2 लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही घरे दर्जेदार व्हावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. चांदीवलीतील प्रकल्प बाधित झोपडपट्टी धारकांना 400 घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाबरोबरच कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या शासनाने गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याण यांची सांगड घालण्याचे काम केले आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
इतर बातम्या :
मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून उचललं
आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो; बाप्पांच्या आगमनापूर्वीच प्रणिती शिंदेंची खंत, महिलांना आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)