नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईत महत्वाची भूमिका बजावलेले ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह हे आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  आयपीएस असलेल्या  राजेश्वर सिंह यांनी याबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरु केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 


एन्काऊंटर स्पेशलिस्ट या नावाने ओळखले जाणारे राजेश्वर सिंह यांनी ईडीमध्ये कार्यरत असताना अनेक हाय प्रोफाईल केसेसची तपासणी केली आहे. एयरटेल मॅक्सिम, 2G स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, ऑगस्टा वेस्टलॅन्ड या सारख्या अनेक प्रकरणांच्या तपासामध्ये  राजेश्वर सिंह यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. राजेश्वर सिंह यांची बहिण, आभा सिंह यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारला असून आता वेगळ्या माध्यमातून देशाची सेवा करणार आहेत. 


 






राजेश्वर सिंह सध्या लखनऊमध्ये ईडीचे संयुक्त निदेशक म्हणून कार्यरत आहेत. सन 2009 साली ते प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये आले होते. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी निवडणूक ते लढणार किंवा नाही ते अद्याप स्पष्ट झालं नाही. 


पी चिदंबरम यांच्या विरोधात तपास
राजेश्वर सिंह यांनी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंमबरम आणि त्यांचे पुत्र किर्ती चिदंबरम यांच्याविरोधात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील तपासामध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. राजेश्वर सिंह हे उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी असून त्यांनी कायदा आणि मानवाधिकार या क्षेत्रामध्ये पदवी संपादन केली आहे. एका प्रकरणामध्ये, 2018 साली राजेश्वर सिंह यांच्याविरोधात चौकशी करण्यात आली होती पण ते निर्दोष सुटले. 


महत्वाच्या बातम्या :