जालना : कदाचित मुंडे साहेब राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये बिलकुल नाराजी नसल्याचं म्हंटलय. जालना येथे काल (गुरुवारी) भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पंकजा मुंडे समर्थकांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवून जन आशीर्वाद यात्रे विरोधात घोषणाबाजी केली होती. याच घोषणेचा संदर्भ देऊन रावसाहेब दानवे यांना डॉक्टर भागवत कराड यांना प्रीतम मुंडे यांना डावलून मंत्रीपद दिल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे का? असा प्रश्‍न करण्यात आला होता.


जनआशीर्वाद यात्रेदरम्यान अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी मुंडे समर्थकांमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचं अधोरेखित केलं. दरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत ज्या लोकांनी घोषणाबाजी केली ते भाजपचेच असतील असे मला वाटत नाही. आमच्यासारख्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात कोणीही येऊन काहीही करू शकतो, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिलं.


5 ते 6 समर्थकांनी केली होती घोषणाबाजी
गुरुवारी परभणीहुन जालना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत भाजप कार्यकर्त्यांकडून करण्याची जय्यत तयारी झाली होती. दरम्यान स्वागत समारंभ अगोदरच पाच ते सहा युवकांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा हातात धरून गोपीनाथ मुंडे अमर रहे तसेच भगवानगडाची गद्दारी करणाऱ्यांना गद्दारी पचत नाही असं म्हणत घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या होत्या. दरम्यान पुढच्या काही वेळात हे कार्यकर्ते बाजूला झाले, त्यांना कोणीही आडवण्याचा प्रयत्न केला नाही.


यावेळी आम्ही पंकजा मुंडे समर्थक म्हणणाऱ्या नितीन कायंदे या युवकाला याविषयी विचारणा केली असता त्याने प्रतिक्रिया दिली. दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाड्या, वस्ती तांड्यावर नेली, त्यामुळे अठरा पगड जातीची पार्टी म्हणूनच भाजप ओळखली जाते, बाकी आमच्या घोषणा समजणे वालो को इशारा काफी है असं म्हटलंय.