(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मागितला पाठिंबा, तृणमूल अध्यक्षा म्हणाल्या...
Draupadi Murmu Presidential Election: एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते.
Draupadi Murmu Presidential Election: एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुर्मू यांना एनडीएशिवाय इतर काही पक्षांच्या पाठिंब्याचीही गरज आहे, ज्यासाठी त्यांनी स्वत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी ममता यांच्या समर्थनार्थ त्यांच्याशी बोलल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
द्रौपदी मुर्मू यांच्याशी फोनवरून संवाद साधताना ममता बॅनर्जी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र ममता यांनी त्यांना आपलं समर्थ देण्याबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला समर्थन द्यायचं हे पक्ष ठरवेल, असे मुर्मू यांना त्यांनी सांगितलं. असं असलं तरी ममता यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा मिळणे शक्य दिसत नाही. कारण त्यांच्याच पक्षाचे टीएमसीचे नेते यशवंत सिन्हा हे देखील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिंगणात आहेत. विरोधी पक्षांनी परस्पर संमतीने त्यांना उमेदवारी दिली आहे.
ममता बॅनर्जींव्यतिरिक्त एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली आहे. ज्यामध्ये त्यांनी या सर्व मोठ्या पक्षांचा पाठिंबा मागितला आहे. मुर्मू यांना सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांनी औपचारिकता म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांना हा फोन केला असला तरी. त्यांना सध्या तरी इतर कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही. कारण नवीन पटनायक यांच्या बीजेडी आणि जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर त्या बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष या आकडेवारीपासून खूप दूर असल्याचे दिसत आहे. म्हणजेच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणे जवळपास निश्चित आहे. विरोधी पक्षाकडून टीएमसी नेते यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ते 27 जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.