सांगली, भिवंडीच्या जागेवरुन मविआत वादाचा तिढा? नाना पटोले नाराज, महाविकास आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार
Sangli Bhiwandi Lok Sabha Seat: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नाराजीवरुन संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? असा थेट सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
Maharashtra Politics : मुंबई : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आज महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghdi) बैठकीला गैरहजर असणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीची जागा परस्पर घोषित केल्यानं नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या चर्चेत सांगली (Sangli) आणि भिवंडी (Bhiwandi) ही जागा काँग्रेसला (Congress) देण्यावर जवळपास एकमत झाले होते. असं असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना काल घोषित केली. त्यामुळे नाना पटोले नाराज आहेत, असं बोललं जातंय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नाराजीवरुन संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? असा थेट सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "कोणीही पक्षाच्या प्रचार यंत्रणेवर बहिष्काराची भाषा करत असेल, तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं, तर याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचं नेतृत्त्व काँग्रेसनं करावं असं आम्ही मानतो. देशाचा पंतप्रधान काँग्रेसचा असावा अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे एका सांगलीसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? हे त्यांनी सांगावं."
नाना पटोलेंच्या नाराजीचं नेमकं कारण काय?
सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मनभेद निर्माण झालेले आहेत. ज्याप्रकारे दोन्ही पक्षांची निर्णय घेण्याची शैली फारच वेगळी आहे. काँग्रेसचे सर्व निर्णय दिल्लीत त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून घेतले जातात. तर ठाकरेंची घोषणा म्हणजे, पक्षासाठी अंतिम निर्णय असतो. पण दोन्ही पक्ष महाविकास आघाडीतील घटकपक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतात, त्यावेळी मात्र त्यांना महाविकास आघाडीचेच नियम आणि निर्णय पाळावे लागतात. सांगलीच्या जागेवरुन ज्यावेळी महाविकास आघाडीच्या चर्चा झाल्या, त्यावेळी दोन्ही जागा या काँग्रेसकडे देण्याबाबात एकमत झालेलं. पण सध्या याच जागेवरुन वाद निर्माण झाला आहे. चर्चेतून निर्णय होणं अपेक्षित होतं, मात्र ठाकरेंनी परस्पर निर्णय घेतला आणि घोषणाही केली. नाना पटोलेंच्या नाराजीचं हेच कारण असल्याचं समोर येत आहे.
पाहा व्हिडीओ : Sanjay Raut Full PC : सांगलीवरुन जास्त आवाज करु नका, संजय राऊतांचा मोदींना सल्ला : ABP Majha