Dipak Kate-Pravin Gaikwad: इंदापूरचा रहिवाशी, 6 महिन्याआधी पिस्तुल अन् 28 काडतुसांसह पुणे विमानतळावर अटक; प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा कोण आहे दीपक काटे?
Dipak Kate-Pravin Gaikwad: दीपक काटे हा इंदापूरचा रहिवासी आहे. भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत जवळचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखलं जातं.

Dipak Kate-Pravin Gaikwad: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काल (13 जुलै) अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शाईफेक करण्यात आली. सदर प्रकरणी भाजप कार्यकर्ता दीपक काटे (Dipak Kate) याच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अंगावर शाई-वंगण टाकणे, धक्काबुक्की करणे, हाताने मारहाण करणे तसेच गाडीला दगड मारून नुकसान करणे असे फिर्यादीत नमूद केले आहेत. अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे दीपक काटे? (Who Is Dipak Kate?)
दीपक काटे हा इंदापूरचा रहिवासी आहे. भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत जवळचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखलं जातं. भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव असलेल्या दीपक काटे याला सहा जानेवारी 2025 ला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली. दीपक काटे पुण्याहुन हैद्राबादला विमानाने जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. विमानतळावरील सुरक्षा तपासणी दरम्यान यंत्रणेला त्याच्या बॅगमधे एक पिस्तुल आणि 28 काडतुसं आढळून आली. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने दीपक काटेला पोलीसांच्या हवाली केले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दीपक काटेचे चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांसोबत अनेक फोटो आढळून येतात.चार वर्षांपूर्वी दीपक काटेने संभाजी बिडी नाव बदलण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर आमरण उपोषण छेडले होते. त्यानंतर संभाजी बिडीचे नाव 'साबळे बिडी' असे करण्यात त्याला यश आले. आता संभाजी ब्रिगेड हे छत्रपती संभाजी महाराजांचे एकरी नाव होत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाव बदलावं अशी मागणी दीपक काटे यांची आहे.
कोण आहेत प्रवीण गायकवाड? (Who Is Pravin Gaikwad)
प्रवीण गायकवाड यांचा जन्म ऑक्टोबर 1968 ला झालाय. प्रवीण गायकवाड यांनी सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण केले आहे. 1990 च्या दशकात प्रवीण गायकवाड बामसेफ , मराठा सेला संघ , मराठा महासंघ या संघटनांमधे सक्रिय झाले. बहुजन समाजाची सांस्कृतिक लढाई लढण्यासाठी आपण काम करत आहोत असा त्यांचा दावा असतो. 1997 ला पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडची स्थापना केली. बहुजन समाजातील तरुणांनी व्यवसाय करुन , परदेशात जाऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, यासाठी प्रवीण गायकवाड मोहीम चालवतात. अहद ऑस्ट्रेलीया तहद कॅनडा असं या मोहीमेचे नाव आहे. आनंदतारा गृप ऑफ बीझनेस या नावाने प्रवीण गायकवाड व्यवसाय करतात.
नेमकी घटना काय?
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर 13 जुलैला दुपारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. ते काल अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण गायकवाड आपल्या गाडीतून कमलाराजे चौकाच्या परिसरात उतरले. त्यावेळी शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले. या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना आक्रमकपणे गाडीतून खेचून बाहेर काढले आणि त्यांच्या चेहऱ्यावर वंगणाचे काळे तेल ओतले. त्यामुळे गायकवाडांचा संपूर्ण चेहरा काळ्या रंगाने माखला होता. यानंतरही शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाडांना पकडून ठेवले होते.























