'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
धर्मवीर 2 सिनेमाबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, चित्रपट पाहताना घटनाक्रम पाहायला हवी. काही लोकांना असं वाटत की शिवसेना त्यांच्यापासून जन्मली, पण असे नाही ती बाळासाहेबांनी बनवली.
मुंबई : दिवंगत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गुरुस्थानी असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनपटाचा भाग 2 म्हणजेच धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा बहुचर्चित सिनेमा शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचे स्क्रिनींग अनेक ठिकाणी मोफत करण्यात आले. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी चित्रपटावर चर्चाही सुरू केली आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Election) तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय. तर, आनंद दिंघेंना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न होतोय, अशी थेट टीका संजय राऊत यांनी केलीय. आता, धर्मवीर 2 सिनेमावरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यात जुंपल्याचं दिसून आलं.
धर्मवीर 2 सिनेमाबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, चित्रपट पाहताना घटनाक्रम पाहायला हवी. काही लोकांना असं वाटत की शिवसेना त्यांच्यापासून जन्मली, पण असे नाही ती बाळासाहेबांनी बनवली. दिघे साहेब यांनी जे घडवले त्यावर पाणी फिरण्याचे काम करतात. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात आल्याचे दाखवले तर त्याला वेगळा संदर्भ लावू नका, असे संजय शिरसाट यांनी म्हटलं. त्यांच्या अकलेचा कमीपणा दिसतो. दिघे साहेब ठाण्यापासून मातोश्रीवर जायचे तो काळ तसा होता. आता मातोश्रीवर गेल्यावर अस समजते की हे लोक सिल्व्हर ओकवर असतात, आम्हाला तिकडे जायचं नव्हत म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो, असेही शिरसाट यांनी म्हटले. तसेच, आनंद दिघे यांना मारलं गेलं, अख्खा ठाणे जिल्हा जाणतो की त्यांचा घातपात झालाय, असा गंभीर आरोपही संजय शिरसाट यांनी केला आहे. आता, शिरसाट यांच्या आरोपावर आनंद दिघेंचे दुसरे शिष्य आणि ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पलटवार केला आहे.
केदार दिघेंकडून सिनेमा न पाहण्याचं आवाहन
धर्मवीर एक असो किंवा धर्मवीर दोन असो हा चित्रपट बनवणारी सगळी मंडळी ही गोंधळलेला अवस्थेत असलेले दिसतात. स्वतःची प्रतिमा कशी सांभाळावी आणि आपण केलेली गद्दारी हे आपण लोकांसमोर चांगल्या पद्धतीने मांडून आपली प्रतिमा सांभाळण्याचं काम किंवा हा केविलवाणा प्रयत्न करतानाही मंडळी दिसतात. उद्धव साहेबांची नेमणूक किंवा त्या काळात बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी केलेली ही नेमणूक होती, आणि त्याच्यावरती हा प्रश्न विचारला जातोय हा माझा थेट आरोप आहे, असे म्हणत केदार दिघे यांनी सिनेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बाळासाहेबांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला चुकीचा वाटतंय का आणि जर चुकीचा वाटत असेल म्हणून तुम्ही दिघे साहेबांच्या आडोशाला जाऊन दिघे साहेबांना पुढे करून तुम्ही हा प्रश्न विचारत आहे का, असा सवालही राजन विचारे यांनी केला आहे. बाळासाहेबांनी घेतलेला कोणताही निर्णय असो, तो बरोबर की चुकीचा हा विषयच कधी आला नाही. बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे असे प्रत्येक शिवसैनिकाला वाटत होते आणि आजही वाटते
लोकांनी हा धर्मवीर चित्रपट पाहूच नये, यामागचं कारण असं आहे की, दिघे साहेबांचं आयुष्य हे खूप वेगळं होतं. दिघे साहेबांचा संबंध आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा होता, त्यांनी जो दाखवलेला आहे, तो स्वतःवरती केंद्रित असा दाखवलेला आहे. दिघे साहेब थोडा वेळ आणि बाकी पूर्ण वेळ तुमची इमेज बिल्डिंग करण्याचा जो प्रयत्न करताय हे लोकं समजू शकत नाहीत किंवा लोकं एवढे मूर्ख आहेत, असं कोणीही समजू नये. लोकांना तुम्ही केलेली गद्दारी हे व्यवस्थित लक्षात आहे, निवडणूक आले की दिघे साहेबांच्या नावाचं भांडवल करण्याचा काम अनेक लोक करतात.
तेव्हा तुम्ही शांत का बसला?
माझं थेट संजय शिरसाट यांना आव्हान आहे की, जर का ते म्हणत असतील महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही गोष्ट माहिती होती तर तुमचे हे दैवत होते. तुमच्या दैवतावरती हा घाला घातला जात होता, तेव्हा तुम्ही का काय करत होतात. तुम्ही सदैव पद उपभोगलीत, जर अशा पद्धतीचा घाला घातला होता तर तुम्ही का शांत बसलात आणि आज 23 वर्षानंतर काय प्रश्न उपस्थित करताय, असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केलाय.
आनंद दिघेंना मी अग्नि दिलाय
याचा अर्थ असा या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का, तुमच्याकडे जर पुरावे असतील तर आज मी थेटपणे सांगतो की, केदार दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काही मी अग्नी दिला, त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेऊन या लोकांनी तर्कवितर्क लावून महाराष्ट्रातल्या जनतेला भ्रमात ठेवू नये, असेही केदार दिघे यांनी म्हटले.
हेही वाचा
शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल