नागपुरात महायुती व्हावी असा देवेंद्र फडणवीसांचा आग्रह, पण मित्रपक्षानी सामंजस्य दाखवलं तरच...; भाजपच्या निवडणूक प्रभारीचे स्पष्ट संकेत
Nagpur Election 2026: आमचे सर्व वरिष्ठ नेते महायुती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. फक्त मित्र पक्षांचा जास्त जागांच्या आग्रह संदर्भात काय निर्णय होतो, यावर महायुतीचं भवितव्य ठरेल, असे दटके म्हणाले.

Nagpur Municipal Corporation Election 2026 : नागपुरात महायुती व्हावी, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आग्रह आहे. त्या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते प्रयत्नही करत आहेत. मित्र पक्षांनी जागांसंदर्भात सामंजस्य दाखवलं तर निश्चितच नागपुरात महायुती होईल, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी दिली आहे. सध्या नागपुरात मित्र पक्षांसोबत महायुतीसाठीची चर्चा सुरू आहे. आमचे सर्व वरिष्ठ नेते महायुती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. फक्त मित्र पक्षांचा जास्त जागांच्या आग्रह संदर्भात काय निर्णय होतो, यावर महायुतीचं भवितव्य ठरेल, असे दटके म्हणाले.
Nagpur Election 2026 : नागपुर महापालिकेत 151 जागांपैकी भाजपचे 108 नगरसेवक
नागपुर महापालिकेत 151 जागा आहेत. सध्या भाजपचे 108 नगरसेवक आहेत. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे दोन नगरसेवक असून यंदा शिवसेनेने भाजपकडे 50 जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूर महापालिकेत 1 नगरसेवक असून यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने किमान 15% जागांची मागणी केली आहे. त्यामुळे मित्र पक्षांच्या जास्त जागांच्या मागणीचा गुंता कसा सोडवावा, असा प्रश्न भाजप समोर आहे.
Municipal Corporation Election 2026: उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्या इच्छुकांची मोठी गर्दी
दुसरीकडे, महापालिकेच्या विविध झोन कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्या इच्छुकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होताच पहिल्याच तासात मोठ्या संख्येने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेय. नागपूर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळपासूनच महापालिकेच्या सर्व दहा झोन कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.. भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज घेऊन जात आहेत. नागपुरात विविध पक्षांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून मुलाखती देणारे इच्छुक उमेदवार त्यांच्या पक्षांच्या अधिकृत उमेदवार यादीची वाट पाहत आहेत.
मात्र, संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी विविध पक्ष त्यांच्या उमेदवारांची यादी उशिरा जाहीर करतील, त्यामुळे सर्व इच्छुक कार्यकर्त्यांनी सध्या तरी उमेदवारी अर्ज घेऊन अर्ज दाखल करण्याचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे विविध झोन कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची गर्दी वाढल्याचा चित्र आहे.
- उमेदवारी अर्ज ऑफलाइन भरता येईल.
- रोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजताच्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येईल.
- उमेदवारी अर्ज महापालिकेच्या विविध झोन कार्यालयातून निशुल्क मिळेल.
-23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.
-25 डिसेंबर रोजी ख्रिसमस तर 28 डिसेंबर रोजी रविवार असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार नाही.
आणखी वाचा























