Devendra Fadnavis : मला मराठा आरक्षणावरून अनेक नेत्यांकडून टार्गेट केलं जातं , पण इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : "मला मराठा आरक्षणावरून अनेक नेत्यांकडून टार्गेट केलं जातं , पण इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही", असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
Devendra Fadnavis : "मला मराठा आरक्षणावरून अनेक नेत्यांकडून टार्गेट केलं जातं , पण इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही", असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त, स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मार्फत आयोजित लाभार्थी मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयाचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझा प्रयत्न आहे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आणि ते टिकवलं आणि टिकवून ठेवणार आहोत. आता मराठा समाजातील युवकांना नोकऱ्या मिळायला लागल्या आहेत, असं देखील फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार आ. शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नोकरी मागणारे नाहीत तर नोकरी देणारे हात मराठा समाजामध्ये तयार झाले पाहिजे आणि या दृष्टीने आम्ही स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना केली. स्व. अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि श्रीमंत छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून मराठा समाजात 1 लाख उद्योजक तयार झाले. महामंडळाच्या माध्यमातून ₹8.5 हजार कोटींचे कर्ज मराठा तरूणांना मिळाले. त्याचे व्याज महामंडळ भरते आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने या कर्जवाटपात महत्त्वाची भूमिका बजावली, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सारथी'सारखी संस्था आपण तयार केली, गरीब शेतकऱ्याचा मुलगा कोचिंग क्लासेसची फी भरु शकत नाही, सारथीच्या माध्यमातून त्यांना हे दालन उपलब्ध करुन दिले. 'सारथी' होती म्हणून आम्ही घडलो असे म्हणणारे आयएएस, डीवायएसपी पाहतो तेव्हा मनापासून आनंद वाटतो. खासगी महाविद्यालयामध्ये 507 कोर्सेसमध्ये आमच्या मराठा तरुण-तरुणींची फी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने केला, त्यासाठी ₹1600 कोटी द्यायला सुरुवात केली. मुलींकरता मोफत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणूनच आमच्या सरकारने 10% आरक्षण दिले. आम्ही ते टिकवून ठेवणारच आहोत. 17 हजार पदांसाठी पोलीस भरती झाली त्यामध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त मराठा तरुणांना जागा मिळाली आहे. इतिहास शिव्याशापांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. जेव्हा योजनांचे मूल्यमापन होईल तेव्हा मराठा समाजासाठी केलेले हे कार्य लक्षात ठेवले जाईल, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या
शरद पवारांबाबत बोलू नये अशी विनंती मी स्वतः मोदींना केली होती, पण त्यांनी 'भटकती आत्मा' म्हटल्यामुळे फटका बसला , अजित पवारांची कबुली