Devendra Fadnavis on Malegaon Blast Case Verdict : मालेगाव स्फोट प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, दहशतवाद ना कधी भगवा...
Devendra Fadnavis on Malegaon Blast Case Verdict : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला.

Devendra Fadnavis on Malegaon Blast Case Verdict : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Malegaon Blast Case) निकाल आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेक कुटुंबांचं आयुष्य उध्वस्त झालं. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. "केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले आहे. आता न्यायालयाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!#MalegaonVerdict
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
भगवा दहशतवाद म्हणत राजकारण करणाऱ्यांना कोर्टाची सणसणीत चपराक : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, न्यायालयाच्या निकालाचं सर्वांनी स्वागत केलेले आहे. पण, न्याय मिळताना उशीर झालेला आहे. देर आये दुरुस्त आये. त्यावेळी देशात युपीएचे सरकार होते आणि मोठ्या प्रमाणावर बॉम्ब ब्लास्ट होत होते. त्यावेळेस यूपीए सरकारचं म्हणणं होतं की, दहशतवादाला कुठला रंग नसतो. परंतु, मालेगावचा स्फोट झाला, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की, हा भगवा दहशतवाद आहे. राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच्या निकालामुळे त्यावेळेस केलेल्या राजकारणाला कोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, भगवा दहशतवाद म्हणून हिंदुत्वाला त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू सहिष्णु असतो, देशाच्या विरोधातील कारवाया तो कधीच करत नाही. आजच्या निकालावरून हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























