(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Election 2024 Affidavit : फक्त 55 हजारांची रोख रक्कम, स्वतःचं घरही नाही, 2019 पासून संपत्तीत केवळ 5 कोटींची वाढ; राहुल गांधींची एकूण संपत्ती किती?
Rahul Gandhi, Lok Sabha Election 2024: राहुल गांधी यांच्याकडे एकूण 9,24,59,264 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्याच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 11,14,02,598 रुपये आहे.
Congress Leader Rahul Gandhi Lok Sabha Election 2024 Affidavit : मुंबई : काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड मतदारसंघातून (Wayanad Lok Sabha Constituency) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये मोठा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची बहिण प्रियंका वाड्रासुद्धा (Priyanka Gandhi Vadra) उपस्थित होत्या. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सध्या 55,000 रुपये रोख रक्कम आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचं एकूण उत्पन्न 1,02,78,680 रुपये होते.
राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सध्या 55,000 रुपये रोख आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचे एकूण उत्पन्न 1,02,78,680 रुपये होतं. याशिवाय राहुल गांधींच्या नावावर एनएसएस, पोस्टल सेव्हिंग आणि इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत.
राहुल गांधी यांच्याकडे एकूण 9,24,59,264 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्याच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 11,14,02,598 रुपये आहे. अशाप्रकारे त्यांची एकूण संपत्ती 20,38,61,862 रुपये इतकी आहे. मात्र, राहुल गांधी यांच्यावरही सुमारे 49,79,184 रुपयांची देणं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, राहुल गांधी यांनी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 55 लाख रुपये होती.
शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
राहुल गांधी यांनी त्यांच्या नावावर बँकेत 26.25 लाख रुपये ठेव असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. शेअर बाजारात त्यांची एकूण गुंतवणूक 4.33 कोटी रुपये आहे. राहुल गांधी यांचीही म्युच्युअल फंडात 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक 15.2 लाख रुपये आहे. काँग्रेस नेत्याकडे 4.2 लाख रुपयांचे दागिनेही आहेत.
राहुल गांधींकडे 11 कोटींहून अधिकची स्थावर मालमत्ता
वायनाडच्या खासदाराची स्थावर मालमत्ता 11,15,02,598 रुपये आहे. राहुल गांधी यांच्यावर 49,79,184 रुपयांचं देणं आहे. काँग्रेस नेत्याकडे दिल्लीतील मेहरौली येथे दोन शेतजमिनी आहेत. ते आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी या जमिनीचे संयुक्त मालक आहेत. या जमिनी अनुक्रमे 2.346 आणि 1.432 एकर आहेत. ही जमीन त्यांना वारसाहक्कानं मिळालेली आहे. या जमिनीची सध्याची किंमत 2,10,13,598 रुपये आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी 2019 साली अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. सुरक्षित मतदार संघ म्हणून या वायनाड मतदारसंघाची त्यांनी निवड केली होती. त्याचा मोठा फायदा त्यांना झाला. अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, वायनाडमधून ते चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते. यावेळी दुसऱ्या टर्मसाठीही राहुल गांधींनी वायनाडमधूनच नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ऍनी राजा यांचं आव्हान असेल. त्या भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी आहेत.
राहुल गांधींकडे स्वतःचं घर नाही, पण गुरुग्राममध्ये 9 कोटींच्या दोन कमर्शियल बिल्डिंग
राहुल गांधींकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही. पण गुरुग्राममध्ये 9 कोटींच्या दोन कमर्शियल बिल्डिंग त्यांच्या नावावर आहेत. त्यांची किंमत 9 कोटींहून अधिक आहे.
2019 मध्ये किती होती संपत्ती?
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं, त्यावेळी त्यांच्यावर 72 लाख रुपयांचं कर्ज होतं. गेल्या 5 वर्षांत राहुल गांधी यांच्या संपत्तीत सुमारे 5 कोटींची वाढ झाली आहे.