Congress President Election : डॉ. शशी थरुर यांच्यात कॉंग्रेसला नवी दिशा देण्याची क्षमता : आशिष देशमुख
Congress President Election : नव्या पिढीची, युवकांची, नव-चैतन्याची आणि क्रियाशील कॉंग्रेस हवी असल्यास डॉ. शशी थरुर हे योग्य उमेदवार आहेत," असे डॉ. आशिष देशमुख म्हणाले.
Nagpur News : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या (INC) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे नेते खासदार डॉ. शशी थरुर (Dr. Shashi Tharur) यांनी शुक्रवारी (30 सप्टेंबर) नामांकन भरले. "कॉंग्रेसचे डॉ. शशी थरुर हे लोकप्रिय खासदार आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होत असून, ही स्वागतार्ह बाब आहे," असे कॉंग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे सदस्य माजी आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले.
यासंदर्भात बोलताना डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले की, "पक्षात विकेंद्रीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून कॉंग्रसचे भविष्य उज्ज्वल आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षाला आणखी उंच भरारी घेता यावी, म्हणून कॉंग्रेस श्रेष्ठींनी लोकशाही पद्धतीने निवडणुकीसाठी घेतलेले हे महत्वाचे पाऊल आहे. डॉ. शशी थरुर यांचे पक्षातील सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. पक्षाला नवी दिशा दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे."
थरुर यांना कॉंग्रेस समर्थकांचा उघड पाठिंबा
पक्षाला नव्या ताकदीने पुढे नेऊन देशात कॉंग्रेसला (Congress) सत्तेत आणण्याची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळू शकतील, असा विश्वास आहे. "युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, उद्योग, कृषी, महागाई असे विषय त्यांनी गंभीरतेने हाताळल्यास कॉंग्रेसला सुगीचे दिवस येतील. पारदर्शी राजकारण करुन कॉंग्रेसचा विचार ते तळागाळातील लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचवतील. नव्या पिढीची, युवकांची, नव-चैतन्याची आणि क्रियाशील कॉंग्रेस हवी असल्यास डॉ. शशी थरुर हे योग्य उमेदवार (congress president election) आहेत," असेही डॉ. आशिष देशमुख म्हणाले. 12 राज्यांतील कॉंग्रेस समर्थकांचा त्यांना उघड-उघड पाठिंबा असून संपूर्ण भारतातील कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. ते निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नवी दिल्ली येथे डॉ. शशी थरूर यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरले त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. देशमुख उपस्थित होते.
थरुर आज सायंकाळी नागपुरात
आज 1 व उद्या, 2 ऑक्टोबर 2022 ला खासदार डॉ. शशी थरुर नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी समस्त कॉंग्रेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी यावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे. 1 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी खासदार थरुर दीक्षाभूमीवर येतील. येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर नागपुरात त्यांचा मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला ते वर्ध्याला जाणार आहेत. तिथून पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमाला ते भेट देणार असल्याचेही डॉ. आशिष देशमुख यांनी सांगितले.
पक्षाला दमाच्या नेत्याची गरज
काँग्रेस पक्ष आधीच अडचणीत आहे. गेले सात आठ वर्ष काँग्रेस सातत्याने निवडणुकीच्या निकालात पिछाडीवर आहे. अशा परिस्थिती दिवसागणिक आणखी वाईट होत आहे. अशा वेळेत गुणात्मक बदल आवश्यक आहे आणि तोच शशी थरुर यांचा प्रयत्न असल्याचे मत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. अडचणीच्या या काळात काँग्रेसला नवीन दमाचा नेता आवश्यक आहे. तेव्हाच देशातील लोकसंख्येत 52 टक्के प्रमाण असलेले तरुण काँग्रेसला पाठिंबा देतील. काँग्रेसच्या पारंपरिक मतदाराव्यतिरिक्त इतर मतदारांचा पाठिंबा मिळेल असे आशिष देशमुख म्हणाले. आतापर्यंत काँग्रेस ज्या कार्यपद्धतीने चालत आहे. त्यात बदल केले नाही, तर येणाऱ्या काळात आणखी अडचणी वाढतील. म्हणून वयस्कर अध्यक्ष देण्याऐवजी तुलनेने तरुण शशी थरुर सारखा अध्यक्ष दिला पाहिजे, असेही देशमुख म्हणाले. काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज शशी थरुर नागपुरात येणार असून नागपूरच्या दीक्षाभूमीला ते बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करणार आहे उद्या ते वर्ध्यातील सेवाग्राम ला जाऊन महात्मा गांधींना ही आदरांजली वाहणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Congress President Election : ऐनवेळी दिग्विजय सिंह यांच्याऐवजी खर्गेंच्या नावाला पसंती का मिळाली?