(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde on Baba Siddique Death : बाबा सिद्दिकींची मुंबईत गोळ्या झाडून हत्या, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
CM Eknath Shinde on Baba Siddique death : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
CM Eknath Shinde on Baba Siddique death : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून मुख्यमंत्री शिंदे यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही केस फास्टट्रॅकमध्ये घेण्यात येणार असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच गोळीबार करण्यात आला आहे. झिशान सिद्दीकी यांच्यावर एकूण सहा गोळ्या फायर करण्यात आल्या होत्या. त्यातील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. यातील दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं असून यातील एक शूटर हा हरियाणा आणि एक शूटर हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या आरोपीच्या मागावर पोलीस सध्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी काय म्हटलं?
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की,बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्या तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एक हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. एका आरोपीच्या मागावर पोलीस सध्या आहेत. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंबई पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. ही केसही आपण फास्टट्रॅकवर घेण्याची मागणी करु.अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई करण्यात येईल. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून याचा तपास घेतला जाईल.
नेमकं काय घडलं?
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरात गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी (baba siddique Firing) यांच्या कार्यालयाबाहेर साधारण आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या छातीत तीन गोळ्या घुसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. येथील खेरवाडी जंक्शनजवळ असणाऱ्या सिग्नलवर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, तीन व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि ते पसार झाले. हे लोक नक्की कोण होते आणि त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर का गोळीबार केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ही बातमी वाचा :
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?