दिल्लीत शिंदेंची मोठी डील; मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपच्या पारड्यात, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट, नेमकं समीकरण काय?
राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) असे तिन पक्ष सहभागी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नव्हता. पण अखेर तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे.
CM Eknath Shinde Amit Shah Seat Sharing Deal : मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे ती, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीतील (NCP) अंतर्गत बंडाळीमुळे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपाची धांदल सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि अमित शहांची (Amit Shah) दिल्लीत (Delhi) भेट झाल्याची माहिती समोर आल्याचं समोर येत आहे. या भेटीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत (Lok Sabha Seat Sharing) चर्चा झाली असून शिंदे आणि शहांमध्ये डील पक्की झाल्याचं समजत आहे.
राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) असे तिन पक्ष सहभागी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नव्हता. अशातच 'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, शिंदेंच्या दिल्ली भेटीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटल्याचं बोललं जात आहे. शिंदेंचा मान राखत भाजपनं शिवसेनेसाठी 13 जागा देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण त्याबदल्यात भाजपनं शिंदेंकडे मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांपैकी पाच लोकसभेच्या जागांची मागणी केली असून शिंदेंनी त्यासाठी होकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, शिंदेंची शिवसेना राज्यात धनुष्यबाणावर लोकसभेच्या 13 जागा लढणार आहे. पण, त्याबदल्यात शिंदेंना मुंबई सोडावी लागली आहे. मुंबईतील सहापैकी पाच लोकसभेच्या जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे. सध्याचं मुंबईतील समीकरण पाहता शिंदेंकडे मुंबईतील दोन खासदार आहेत. एक राहुल शेवाळे आणि दुसरे गजानन किर्तीकर. राहुल शेवाळेंचा मतदारसंघ शिवसेनेकडे देण्यात आला आहे. तर, एकनाथ शिंदेंनी गजानन कीर्तिकर यांच्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेच्या जागेच्या बदल्यात ठाण्याची जागा मागितल्याचं समजंत आहे. त्यामुळे विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचं तिकीट कन्फर्म झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण शिंदेंनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांची जागा भाजपला सोडल्यामुळे आता गजानन किर्तीकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिंदे गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये एक करार झाला आहे, ज्यामध्ये भाजप 31 जागा लढवणार आहे, शिवसेना 13 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारामती, शिरूर आणि रायगड व्यतिरिक्त परभणी अशा चार जागांची ऑफर देण्यात आली आहे.
गजानन किर्तीकरांचं काय?
शिंदेंनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांची जागा भाजपला सोडल्यामुळे आता गजानन किर्तीकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेना धनुष्यबाणासह राज्यातील 12 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तर गजानन किर्तीकरांची जागा त्यांनी भाजपला सोडली आहे. त्यामुळे आता उत्तर-पश्चिम मुंबईतून सलग दोनवेळा खासदार राहिलेल्या गजानन किर्तीकरांचं काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशातच शिंदे गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन किर्तीकरांना विधानपरिषदेवर पाठवलं जाईल.
दरम्यान, शिंदे आणि शाह यांच्यात लोकसभा जागावाटपाबाबतची डील क्लोज झाली असून या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदेंना शब्द देत, आम्ही तुमचा योग्य आदर राखू असं सांगितलं आहे, असंही शिंदे गटाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.