काल अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, आज थेट बारामतीत जाऊन घराबाहेर आंदोलन, भुजबळ समर्थक इरेला पेटले!
Chhagan Bhujbal Supporter Aggressive : मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावल्याचा निषेध व्यक्त करत भुजबळ समर्थक आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत.
नाशिक: बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या बाहेर ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं मंत्रीपद नाकारलं. त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करीत आहोत, असं आंदोलकांचे म्हणणं आहे. तसेच लवकरात लवकर अजित पवारांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अन्यथा बारामतीत उद्रेक करू. असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
तसेच 22 तारखेला बारामतीत अजित पवारांचा नागरिसत्कार आहे, त्यावेळेस अजित पवारांना आम्ही जाब विचारू. असं ओबीसी आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काल अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत केलेल्या आंदोलनानंतर भुजबळ समर्थक इरेला पेटले असून आज थेट बारामतीत जाऊन अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा भुजबळ समर्थकांनी घेतला आहे.
प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे
दरम्यान, आज कार्यकत्यांची बैठक झाल्यानंतर भुजबळांनी (Chhagan Bhujbal) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आपले मत व्यक्त केले आहे. मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय हा त्या पक्षाचा प्रमुख घेत असतो. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, तसं शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसंच आमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात. प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे, असंही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणालेत.
मला जे काही कळलं आहे, त्यावरून माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते. त्यांनी आग्रहा धरला होता ते देखील मी निश्चित कन्फर्म करून घेतला आहे. मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावे लागेल असेही ते यावेळी म्हणालेत.
आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदारांचं छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हव होतं, असं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली, विधानसभेला भुजबळांमुळेच ओबीसी समाज एक व्हायला मदत झाली. त्यामुळे भुजबळांना मंत्री करणं गरजेचं होतं, असं आमदारांचं मत असल्याचे समजते. आता भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती देखील आमदारांमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
- मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
- Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....