Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Nashik Lok Sabha Election : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचेच आदेश पाळले जात नसल्याची खंत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. जागावाटपात अजित पवारांनीही ठाम भूमिका न घेतल्याने अनेक जागा हातून गेल्याची तक्रारही पक्षात असल्याची चर्चा आहे.
मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अचानक नाशिक लोकसभा निवडणूकीतून (Nashik Lok Sabha Election) माघार घेण्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि तीन आठवडे आपली उमेदवारी जाहीर न झाल्याने थेट निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी बोलताना आपण पक्ष श्रेष्ठींवर नाराज नाही असं म्हणताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांचेच आदेश पाळले जात नसल्याची खंत बोलून दाखवली.
महायुतीत तीन पक्षांच्या रस्सीखेचीमध्ये अडकलेल्या जागांमध्ये नाशिकच्या जागेचा समावेश आहे. शिवसेनेच्या या परंपरागत जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीनं दावा सांगितल्यामुळं निर्णयच होत नव्हता. त्यामुळं छगन भुजबळ यांनी वैतागून निवडणुकीतूनच माघार घेतली.
छगन भुजबळ म्हणाले की, मला खरंच उमेदवारी देणार आहेत का म्हणून मी देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांना फोन केले. ते म्हणाले अमित शाह यांनीच तुम्हाला उमेदवारी द्यायला सांगितली आहे.
पण तरीही या जागेचा निर्णय न झाल्याने आता भुजबळांनी माघार घेतली. ही जागा आपल्याकडे घेण्यात राष्ट्रवादीने हवी तेवढी ताकद लावली नसल्याचं दिसतंय.
सिंधुदुर्गची जागा भाजपला गेल्याने निर्णय?
सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा भाजपला आणि नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आली असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. ही बाब लक्षात आल्यामुळेच आधीच छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असल्याची बाब समोर आली आहे.
भुजबळांकडून दबावतंत्राचा वापर?
सध्या राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की, मागील तीन आठवडे उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे भुजबळांनी दबाव तंत्राचा वापर केला आहे. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या निर्णयामुळे हेमंत गोडसे यांनी मात्र आनंद व्यक्त करत उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याची भूमिका घेतली आहे.
अजित पवारांच्या जागावाटपातील भूमिकेवर नाराजी
छगन भुजबळ यांच्या उमेदवारी माघारी घेण्याच्या निर्णयानंतर आणखी एक बाब एबीपी माझाच्या हाती लागली आहे. अजित पवार यांनी महायुतीत सातारची जागा तर भाजपला दिली, मात्र त्या बदल्यात मिळालेली नाशिकची जागा केवळ वेळीच भूमिका न घेतल्यामुळे घालवली आहे. अजित पवारांच्या जागा वाटपातील एकंदरीत भूमिकेवर पक्षातील एका गटाने नाराजी व्यक्त केली आहे
नाशिक, सातारा, गडचिरोली आणि परभणी सारख्या महत्त्वाच्या जागा केवळ महायुतीतील घटक पक्षांच्या दबावाला बळी पडून अजित पवार यांनी घालवल्या. ज्या जागा पडतील अशा जागा पदरात पाडून घेतल्या असा सूर पक्षातील एका गटाचा आहे. तसेच केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल जागावाटपाचा निर्णय घेत असल्यामुळे अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाशिकवरुन सुरु झालेला नाराजीचा सूर पक्षांतर्गत वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही बातमी वाचा: